संगीत योगायोग (अंक-2, प्रवेश-4)

(राजा जयसेनाचे दालन.)
राजा जयसेन:मंत्री विप्लव, राजा इंद्रजीताच्या पराक्रमाची काही खबर मिळाली की नाही गुप्तचरांना?
मंत्री विप्लव:महाराज, राजा इंद्रजीत पराक्रम गाजवत नाही यात गुप्तचरांचा काय दोष?
राजा जयसेन:(कठोर होऊन) मंत्री, आम्हाला आपले बोलणे समजते. तुम्ही या कामगिरीवर गुप्तचर रवाना केले आहेत, अशी मी आशा करतो.
मंत्री विप्लव:अर्थात महाराज.
राजा जयसेन:ठीक आहे. आम्ही वाट पाहतोय.
मंत्री विप्लव:होय महाराज.
राजा जयसेन:अवंती राज्यावर शत्रूच्या आक्रमणाची बातमी होती ना? त्याचे काय झाले?
मंत्री विप्लव:महाराज, तीच बातमी देण्यासाठी मी आलो आहे. राजा शूरसेनाने राजा सौमित्राच्या मदतीने शत्रूचा पराभव केला आहे. दोन आघाड्यांवर दोघांचे सैन्य लढत होते. दोहोंत समन्वयदेखिल चांगला होता.
राजा जयसेन:फारच उत्तम! असे राजे त्रिवर्णाचे मित्र आहेत याचे आम्हाला समाधान वाटते.
मंत्री विप्लव:होय महाराज. आणखी एक उल्लेखण्याजोगी गोष्ट अशी की, राजा सौमित्राची बहीण इंदुमती हिने देखिल या लढाईमध्ये भाग घेतला होता आणि तिसरी फळी तिच्या सैन्यासह, ती स्वतः सांभाळत होती.
रण-सौदामिनी, राजस-आर्या,
भगिनी सौमित्राची,
लढून गाजवी रणांगण ते,
परतवून लावी शत्रूसी।

पराभूत होता शत्रू-सैन्य ते,
तत्पर घेई माघार,
तळपते तलवार तिची,
चापल्य-पूर्ण प्रत्येक वार।

सावध पाऊल, सावध चाल,
पराक्रमा ना उणे काही,
समरांगना ती इंदुमती,
शान सुमित्राची।।
राजा जयसेन:उत्तम! प्रशंसनीय आहे! अवंतिकेसारखीच तीही आम्हाला आमची धाकटी बहीण वाटते. तिला उपहार पाठवून तिचे कौतुक करा, मंत्री विप्लव.
मंत्री विप्लव:महाराज, युद्ध जिंकले असले तरीही शत्रूने जागा सोडली नाही. अशा वेळी, प्रशंसेमुळे का होईना, मात्र लक्ष विचलीत होणे ठीक नाही. योग्य समयी आपण निश्चितच राजकन्या इंदुमतीचे कौतुक करावे.
राजा जयसेन:आपले म्हणणे आम्ही मान्य करतो, मंत्री विप्लव. जेव्हा अवंती राज्यात विजयोत्सव होईल तेव्हा आमच्याकडून उपहार नक्की पाठवा.
मंत्री विप्लव:जशी आज्ञा, महाराज.
(गुप्तचर प्रवेश करतो.)
गुप्तचर:महाराजांचा विजय असो.
मंत्री विप्लव:बोल निष्णात.
गुप्तचर:स्वामी, राजा इंद्रजीत यांनी राजा वीरभद्र यांचा पराभव केला असून राजा वीरभद्र यांचे निम्मे सैन्य राजा इंद्रजीत यांनी ताब्यात घेतले आहे.
मंत्री विप्लव:जरा खुलासेवार वृत्तांत दे.
गुप्तचर:महाराज, राजा वीरभद्र यांनी राजा इंद्रजीत यांना युद्धाचे आवाहन दिले होते. राजा इंद्रजीत शुक्ल पंचमीला राजा वीरभद्र यांच्याशी युद्ध करण्यासाठी राजधानी अलकापुरी येथून निघाले आणि अष्टमीला विशाला नदीच्या तीरावर पोचले. चार दिवसांच्या युद्धानंतर राजा वीरभद्र जीवंत पकडल्या गेले. राजा इंद्रजीत यांनी त्यांना अभय दिले. तत्पूर्वी राजा वीरभद्र यांच्या सैन्याने अलकापूरी राज्याच्या सीमेमध्ये घूसखोरी केल्याने राजा इंद्रजीत यांना ठिकठिकाणी कडक पहारे बसवावे लागले. म्हणून मला येण्यास उशिर झाला.
राजा जयसेन:पकडलेले सैन्य? त्याचे काय?
गुप्तचर:सर्व सैनिकांना निःशस्त्र करून सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली आहे. काही काळानंतर त्यांना सैन्यात सामावून घेण्याचा विचार असल्याचे समजते.
मंत्री विप्लव:पुढे बोल.
गुप्तचर:महाराज, राजा इंद्रजीत यांना युद्धात हरवून त्यांना त्रिवर्ण राज्यावर हल्ला करण्यास भाग पाडण्याचा राजा वीरभद्र यांचा डाव होता. मात्र, राजा इंद्रजीत यांच्या पराक्रमामुळे आणि पहारे बसवण्याच्या चतुराईने राजा वीरभद्र यांचा डाव धुळीस मिळाला. युद्धानंतर झालेल्या तहामध्ये राजा इंद्रजीत यांनी त्रिवर्ण राज्याच्या विरुद्ध कोणतीही मदत आपण करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अलकापूरी राज्याची भूमी देखील या कामी वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
मंत्री विप्लव:(हातातील अंगठी काढून देत.) शाब्बास! तू आता जा. तीन दिवसांनी येऊन भेट.
(गुप्तचर जातो.)
राजा जयसेन:(समाधानाने) विप्लवा, ऐकलेस ना. आता तरी राजा इंद्रजीताच्या पराक्रमाबद्दल तुझ्या मानत कोणताही किंतु नसावा.
मंत्री विप्लव:नाही महाराज. ही बातमी ऐकून माझे समाधान झाले.
राजा जयसेन:मग तू तातडीने राजा इंद्रजीताकडे जाऊन त्यांस अवंतिकेचे पाणिग्रहण करण्याविषयी विनंती कर.
मंत्री विप्लव:महाराज, एकदा राजकन्येची मर्जी जाणून घेतली तर ठीक राहील, नाही का?
राजा जयसेन:विप्लवा, अरे अवंतिका माझी बहीण आहे. मी तिच्यासाठी चांगला वर नाही का शोधणार?
मंत्री विप्लव:प्रश्न चांगला-वाईट चा नाहीच मुळी, महाराज. परंतु, पसंती जाणून घेणे उचित राहील.
राजा जयसेन:(चिडून) विप्लवा, मी काही अवंतिकेचा शत्रू नाही. मी तिचा भाऊ आहे आणि तिची पसंती मी जाणून आहे. किंवा हे समज की माझी पसंती हीच तिची पसंती आहे.
मंत्री विप्लव:महाराज, क्षमा असावी. मात्र काही गोष्टी वेळीच स्पष्ट केलेल्या योग्य.
राजा जयसेन:(कडक स्वरात) मंत्री विप्लव, तुम्ही लगेच राजा इंद्रजीत यांच्याकडे आमचा निरोप घेऊन जा.
मंत्री विप्लव:जशी आज्ञा, महाराज.

2 responses to “संगीत योगायोग (अंक-2, प्रवेश-4)”

  1. Saraswati Bhosale Avatar
    Saraswati Bhosale

    Mast challay natak. Kavya Chan. उत्कठावर्धक

    Liked by 1 person

Leave a reply to Saraswati Bhosale Cancel reply