संगीत योगायोग (अंक-2, प्रवेश-3)

(वर्णिका नदीचा दुसऱ्या किनाऱ्यावरचा परिसर. राजकन्या अवंतिकेची राहण्याची व्यवस्था. राजकन्या इंदुमती राजकन्या अवंतिका येण्याची वाट बघतेय. स्वतःशी काही विचाार करतेय.)
राजकन्या इंदुमती:काळोख पडला आणि नदीपारही करून झाली. आता जरा विश्रांती घेते. पुन्हा थोडयाच वेळात परतीचा प्रवास सुरु करायचा आहे. (धनुष्य व भाता खाली ठेवून निवांत जागी बसते.) (दीर्घ श्वास घेते) युद्धाच्या छावणीतून निघाल्यापासून किती तरी विलक्षण घटना घडल्या आहेत. या परिसरात फार पूर्वी बाबांसोबत आले होते मी. लहानच होते. सुमित्र राज्याच्या एक सीमा इथपर्यंत भिडली आहे. म्हणून तेव्हा आवर्जून बाबा हा प्रदेश बघायला आले होते. तेव्हा तर या नदीवर पूल देखील नव्हता. लहान होडक्यातून आम्ही आलो होतो. बाकी सैनिकांनी तर चालतच नदी ओलांडली होती. आता ही तितकाच रम्य आहे हा परिसर. राजा जयसेन यांनी निवास आणि विहारासाठी अनेक ठिकाणी व्यवस्था केली आहे. त्यामुळे या परिसरात किती तरी लोकांची वर्दळ दिसली. (आरक्त होत) आणि तो राजबिंडा तरूणही दिसला. देखणा होता आणि वाघाशी झुंज देण्याइकता शूरही होता. या परिसरात हिंस्त्र श्वापदे असताना, तो असा नि:शस्त्र कसा वावरत होता? मी तर त्याची काही विचारपूसही केली नाही. खरं तर तितका वेळही नव्हता आणि या जोखमीच्या कामगिरीवर असताना कोणाला अशी ओळख देणं देखील बरोबर नाही.
(आकाशाकडे बघत उठून उभी राहते) नभी उगवलेला हा चंद्रही आज इतका मोहक का भासतोय? मेघांच्या आड न लपता, उघडपणे विहार करणाऱ्या या चंद्रामुळे मला त्या वीराची का आठवण होतेय? आणि हे काय? हे मेघ या चंद्राला सोडून जाताय. (लज्जायुक्त आनंदाने) त्याचे विचार मात्र मला सोडत नाहीत.
मनी वसला हा राजकुमार,
मम हृदयी तरंग उठले,
रूप पाहता भान हरपले,
तव तेजस कांती सुकुमार।

व्याघ्रे केला हल्ला घातक,
साहस करिता तू अतिसावध,
झेलून घेता श्वापद ते हिंस्त्र,
धाडस तुझे अचाट फार।

नभी चंद्र आज हा येता,
परतूनी येती आठवणी त्या,
कधी पुन्हा दर्शन वा व्हावे,
स्मरणातील क्षण हे आधार।
(कोणाची तरी चाहूल लागते. इंदुमती आपला भाता व धनुष्य उचलून आडोशाला उभी राहते. राजकन्या अवंतिका प्रवेश करते. इंदुमती राजकन्या अवंतिकेचे बोलणे लक्षपूर्वक ऐकते.)
राजकन्या अवंतिका:आज चार मास होत आले. नाथ, काही क्षेम तरी कळावे आपले. आता आपण लवकर आला नाहीत तर…
राजकन्या इंदुमती:(दचकते) हे काय बोलतेय राजकन्या? (अधिक लक्ष देऊन ऐकते.)
राजकन्या अवंतिका:वेळोवेळी मंत्री विप्लव यांनी विलंब केला म्हणून.. नाही तर दादा महाराजांनी आता पर्यंत मुहुर्त सुद्धा ठरवून ठेवला असता. (घाबरून) नाथ, आपली भेट होण्यापूर्वी तर नाही ना काही घडणार. (हताश होत) किती अभद्र विचार मनात येतात. मात्र प्राक्तनात जे लिहिले आहे ते आपण कसे बदलणार? आणि काय लिहिले आहे ते तरी कसे कळणार?
बिघडवते नि घडवतेही, दैव मानस अपुले।
दैवाहून बलवत्तर कोणी नाही, दैवची हे म्हणे।।
नशीब म्हणा वा प्रारब्ध, वा म्हणा कुणी काही।
हातावरच्या रेषा काही कधी बदलत नाही।।
(अतिदुःखाने आपला चेहरा झाकून घेते. हुंदके देत रडते.)
राजकन्या इंदुमती:राजकन्या फारच दुःखी झाली आहे. आता मी तिच्या समोर जायला हवे. तिचे सांत्वन करून तिला शूरसेन महाराजांचा निरोप द्यायला हवा. पण माझ्या अचानक येण्याने राजकन्या घाबरणार तर नाही ना? (अचानक काही तरी आठवून, अंगरख्याच्या खिशातून सोनचाफ्याचे फूल काढते आणि ते राजकन्येवर पडेल असे टाकते.)
राजकन्या अवंतिका:(दचकून) हे काय पडले! (खाली वाकून फूल उचलते. आनंदीत होते.) अगं बाई! हे तर सोनचाफ्याचे फूल. (आश्चर्याने) नाथ, तुम्ही का आलात? मग असे लपून का? समोर का येत नाही तुम्ही? की मला भास होतोय की कोणी माझी थट्टा करतंय? (व्याकुळ होऊन) कोणी बोलत का नाही? (पुन्हा रडू लागते.)
राजकन्या इंदुमती:प्रयत्न करणे अपुल्या हाती, कर्तव्यास ना मुकणे।
कर्मयोगची आणी तेज, मग नशिबहि मागे फिरे।।
पायी आणून ठेवती मग जगातील सर्व सुखे।
कर्तव्याने घडतो माणूस, कर्तव्य कोणी सांडू नये।।
राजकन्या अवंतिका:(सुखदाश्चर्याने) इतके धीराचे बोल कोण बरं बोलतंय?
राजकन्या इंदुमती:आर्ये, मी शूरसेन महाराजांचा निरोप घेऊन आलेय. तुझी परवानगी असेल तर मी पुढे येऊन परिचय देते.
राजकन्या अवंतिका:कोण बोलतंय? या की, माझ्या समोर या.
राजकन्या इंदुमती:(अवंतिकेसमोर येऊन उभी राहते. तिला नमस्कार करते.) राजकन्या अवंतिका, मी सुमित्र देशाची राजकन्या, इंदुमती, आपल्यासाठी राजा शूरसेन यांचा निरोप घेऊन आले आहे. (शूरसेनाचे नाव ऐकून अवंतिका आनंदीत होते.)
राजकन्या अवंतिका:(तिचे हात हाती घेत) अगं सखीच तू माझी. तू नाथांचा निरोप घेऊन आलीस! मला सांग तरी माझे नाथ मला भेटायला इतके मास का बरं आले नाहीत? ते मला विसरले का? की काही अरिष्ट आले होते? काय झाले, ते जरा विस्ताराने सांग.
राजकन्या इंदुमती:अवंतिके, अगं तुला काहीच का माहित नाही? अजेय राज्यावर म्लेच्छांनी आक्रमण केले होते. शत्रू प्रबळ होता. संपूर्ण तीन मास ही लढाई चालली. महाराज शूरसेन यांना क्षणाची ही उसंत नव्हती. शत्रूला पराजीत करून ते आता राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवत आहेत आणि मला तुझ्याकडे निरोप देण्यासाठी धाडले आहे.
राजकन्या अवंतिका:(अधीर होऊन) काय बरं म्हणालेत नाथ?
राजकन्या इंदुमती:राजा शूरसेन लवकरच येऊन महाराज जयसेन यांना भेटणार आहेत आणि त्यांच्याकडे तुमच्या विवाहासाठी संमती मागणार आहे.
राजकन्या अवंतिका:यासाठी फार उशीर नाही का झाला?
राजकन्या इंदुमती:म्हणजे काय आर्ये?
राजकन्या अवंतिका:दादा महाराजांनी तर माझा विवाह राजा इंद्रजीत यांचेशी ठरवला देखील. आता संमती कशी मागणार आणि कशी देणार?
राजकन्या इंदुमती:अगं, तुला हे समजता क्षणी तू महाराजांना काही सांगितले का नाही?
राजकन्या अवंतिका:मला दादा महाराजांचा स्वभाव पक्का ठावूक आहे, त्यामुळे सांगण्याचे धाडस नाही केले. मंत्री विप्लव यांनी वेळोवेळी विलंब केला म्हणून. नाही तर आता मी इथे सुद्धा येऊ शकले नसते.
राजकन्या इंदुमती:मग आता?
राजकन्या अवंतिका:आता, नाथांना म्हणावे की त्यांनी माझे हरण करावे.
राजकन्या इंदुमती:हरण करावे?
राजकन्या अवंतिका:(निश्चयाने) होय. हरण करावे.
जैसे हरिले श्रीने रमेला
अर्जुने नेले भद्रेला
मज हरून ने तू आता सत्वर । माझ्या प्रियकरा।
बंधू योजिले माझे स्वयंवर
परि मम ह्रदयी तूच प्रियवर
तुझ्याच सवे हे मिलन व्हावे । माझ्या जिवलगा।
राजकन्या इंदुमती:अवंतिके! अगं पण, हे करायचे कसे?
राजकन्या अवंतिका:तू नाथांना माझा निरोप दे. त्यांना सांग की मी तीन दिवसांनी माझा मुक्काम वर्तल तलावाजवळील कमल महालामध्ये हलवेन. हा महाल वर्तला-वर्णिकेच्या संगमापासून जवळ, वर्तला नदीच्या कडेने उत्तर दिशेला आहे. या भागात गर्द आमराई आहे आणि पहाराही विरळ आहे. तिथून माझे हरण करणे अगदी सहज शक्य आहे.
राजकन्या इंदुमती:वाह, मग तर काम सोपं झालं म्हणायचं.
राजकन्या अवंतिका:नाथांना सांग, मी त्यांची वाट पाहत आहे.
राजकन्या इंदुमती:राजा शूरसेन लवकरच तुला आपल्यासोबत नेतील. त्यांच्या वतीने मी तुला ही खात्री देते. मी निघते आता.
(इंदुमती जाते.)

3 responses to “संगीत योगायोग (अंक-2, प्रवेश-3)”

  1. Saraswati Bhosale Avatar
    Saraswati Bhosale

    सुंदर. काव्य पण छान

    Liked by 1 person

  2. Saraswati Bhosale Avatar
    Saraswati Bhosale

    सुंदर. काव्य पण छान.

    Liked by 1 person

    1. धन्यवाद, सरस्वती…

      Like

Leave a reply to nirmiteepublication Cancel reply