
| (शूरसेन राजाची छावणी.) | |
| राजा सौमित्र: | मित्रा, गेले तीन मास ही लढाई आपण लढली. शत्रूही बलाढ्य. मात्र आपली रणनिती सफल झाली. |
| राजा शूरसेन: | पूर्ण तयारीनिशी युद्धभूमीवर उतरल्याचे हे फळ आहे. |
| राजा सौमित्र: | अगदी खरं आहे हे. तू तर रण गाजवले, मित्रा. |
| राजा शूरसेन: | तूही उत्तम पराक्रम गाजवला. हा विजय अवंती साम्राज्याच्या अस्तित्त्वाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. |
| राजा सौमित्र: | विजय महत्त्वाचा आहे खरा. मात्र राजे शूरसेन यांना हा विजय फार आनंददायी वाटत नाही वाटतं. |
| राजा शूरसेन: | (बोलण्याचा रोख न समजल्याने गोंधळून) मला समजलं नाही. |
| राजा सौमित्र: | युद्ध संपल्या दिवसापासून बघतोय मित्रा. काही तरी चिंता तुला अस्वस्थ करतेय. काही विषेश कारण? |
| राजा शूरसेन: | या विजयाच्या निमित्ताने अवंती राज्याच्या सीमा बळकट झाल्या आहेत. शत्रू व शत्रू-एतर, दोहोंमध्ये या विजयामुळे जरब निर्माण झाली आहे. |
| राजा सौमित्र: | ते तर आहेच. याबद्दल तुझे खास अभिनंदन करावे, असा विचार माझ्या मनात आहे. |
| राजा शूरसेन: | अभिनंदन तर मी तुझे करावे. तुझ्या मदतीशिवाय हा विजय प्राप्त करणे असंभव होते. दोन्ही बाजूंनी शत्रू गारद झाला. चांगलीच धूळधाण उडाली. आता पुन्हा इकडे यायचा विचारही नाही करणार. |
| राजा सौमित्र: | (मंद हसत) सर्व श्रेय आपल्यातच वाटून घेणार आहेस की काही माझ्या भगिनीसाठी देखिल ठेवणार आहेस. |
| राजा शूरसेन: | मी आधीच खजिल आहे. अजून नको लाजवूस मला. इंदुमतीच्या पराक्रमाबद्दल माझ्या मनात शंका उरली नाही. आपण पळवून लावलेले सैन्य मधल्या फळीतून येऊ पाहत होते. ही फट जर मोकळी राहिली असती तर आपला पराक्रम काही कामाचा नव्हता. |
| राजा सौमित्र: | तर शेवटी राजे शूरसेन यांनी आमच्या भगिनीचा पराक्रम मान्य केला तर. |
| राजा शूरसेन: | मी मान्य करणे वा न करणे हे काही तिच्या शौर्याचे प्रमाण नाही. तिने गाजवलेला पराक्रम नि:संदेह कौतुकास्पद आहे. |
| राजा सौमित्र: | मग तिचे अभिनंदन कसे करणार? |
| राजा शूरसेन: | तिच्यावर आणखी एक कामगिरी सोपवून. मात्र त्यासाठी मला तुझी परवानगी हवी. |
| राजा सौमित्र: | अच्छा! कोणती बरं? |
| राजा शूरसेन: | अवंतिका राज्याच्या भावी राणीकडे संदेश पोचवण्याची. |
| राजा सौमित्र: | हे काय? |
| राजा शूरसेन: | मित्रा, राजा जयसेनाची धाकटी बहीण, राजकन्या अवंतिका, हिला मी विवाहाचे वचन दिले आहे. आम्ही दर मासी अष्टमीला वर्तला नदीच्या किनारी भेटतो. आता तीन मासाहून अधिक काळ लोटला, माझ्या प्रियेची नि माझी भेट नाही. हे संदेशवहनाचे काम मला इंदुमतीवर सोपवायचे आहे. तुझी परवानगी असल्यास मी ही कामगिरी इंदुमतीवर सोपवू इच्छितो. |
| राजा सौमित्र: | अच्छा! असे आहे तर. मात्र मित्रा, कामगिरी सोपवणारा तू. कामगिरी स्विकारणारी इंदुमती. मग माझी परवानगी कशाला? तू तिलाच विचार? हे बघ, आलीच इंदुमती. |
| (इंदुमती प्रवेश करते.) | |
| राजकन्या इंदुमती: | माझ्याबद्दल काही बोलणे सुरू होते का? |
| (शूरसेन थोडा अस्वस्थ होतो.) | |
| राजा सौमित्र: | (शूरसेनाकडे बघत हसत इंदुमतीला म्हणतो) राजा शूरसेन यांना एका भयंकर समस्येने ग्रासले आहेत. आणि त्यांना तातडीने एका देवदूताच्या मदतीची गरज आहे. |
| राजकन्या इंदुमती: | (गालातल्या गालात हसत) भयंकर समस्या… हं… देवदूताच्या मदतीची गरज… हे तर शत्रूने चाल करून येण्यापेक्षाही भयावह दिसते. |
| राजा सौमित्र: | हो ना. |
| राजकन्या इंदुमती: | तर मग राजा शूरसेन देवदूताची आराधना का करत नाही ते? |
| राजा सौमित्र: | मग, देवदूताचीच तर आराधना सुरू होती, मनातल्या मनात. |
| राजकन्या इंदुमती: | मग अवतरले का देवदूत? |
| राजा सौमित्र: | समजेलच आता. (शूरसेनास..) काय मित्रा, होय ना? |
| राजा शूरसेन: | (संकोचाने) इंदुमती, अगं.. |
| राजकन्या इंदुमती: | काय दादा? |
| राजा शूरसेन: | काही नाही. तू या लढाईने दमली तर नाहीस ना? |
| राजकन्या इंदुमती: | सौमित्र दादाच्या तालमीत तयार झालेय, दमेन कशी! मात्र झालंय काय? मला समजलं नाही. |
| राजा शूरसेन: | (सौमित्राकडे मदतीच्या आशेने बघत..) सौमित्रा…. |
| राजा सौमित्र: | (जणू काही माहितच नाही अशा थाटात) काय मित्रा? मला काही म्हणतोस का? |
| राजा शूरसेन: | (मदत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर, धीर करून) इंदुमती, माझे एक काम करशील का? |
| राजकन्या इंदुमती: | मला शक्य असेल तर नक्की करीन. अजून कुठे गनिम शिरलाय का? |
| राजा सौमित्र: | तर, तर! थेट हृदयातच!! |
| राजकन्या इंदुमती: | बरं, बरं ! फारच धाडसी गनिम आहे की हा ! (गालातल्या गालात हसत) मात्र हा गनिम तर मला दिसणार सुद्धा नाही, मग त्याला पकडायचे कसे? |
| राजा सौमित्र: | (हसत) हेच तर करून दाखवायचे आहे तुला. |
| राजकन्या इंदुमती: | ते कसे? |
| राजा सौमित्र: | (हसत) ते मी कसे सांगणार? ते तर महाराज शूरसेनच सांगू शकतील. होय ना, महाराज? |
| राजा शूरसेन: | (न राहवून) राजकन्या अवंतिकेला तू माझा संदेश पोचवशील का? |
| राजकन्या इंदुमती: | राजकन्या अवंतिका? म्हणजे राजा जयसेन यांची धाकटी बहीण? |
| राजा शूरसेन: | होय, मी तिला विवाहाचे वचन दिले आहे. या युद्धामुळे आमची अनेक मास भेट होऊ शकली नाही. अजून एखाद मास तरी मला इथून हलता येणे शक्य नाही. हा निरोप तिला द्यायचा आहे. |
| निरोप दे हा मम प्रियेला, एकनिष्ठ मी मम वचनाला, येईन लवकर तुज भेटाया, धीर धर तू या घडीला। म्लेंच्छांचे हे युद्ध घडले, तीन मास अविश्रांत लढले, आता नसे शत्रुचे भय जरा, अपुले अंतर समीप आले। | |
| माझे न येण्याचे कारण सांगून तिला माझ्या प्रेमाप्रति आश्वस्त करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवू इच्छितो. इंदुमती, इतके करशील का? | |
| राजकन्या इंदुमती: | (सौमित्राकडे बघत) हे तर फारच जोखमीचे काम आहे. राजकन्या अवंतिका ही राजा जयसेन यांची अत्यंत प्रिय भगिनी. आणि त्यांच्या राज्यात राजकन्येसाठी संदेश न्यायचा म्हणजे स्वतःहून सिंहाच्या जबड्यात मान देण्यासारखे आहे. (सौमित्र आणि इंदुमती हसतात.) |
| राजा शूरसेन: | इंदुमती, तू शूर आहेस, साहसी आहेस. माझे एवढे काम तू सहज करू शकशील. आम्ही दर मासी अष्टमीला वर्तला नदीच्या किनारी भेटायचो. मला खात्री आहे, अजूनही अवंतिका दर महिन्याला आमच्या भेटायच्या ठिकाणी येत असेल. आता कुठे अजून अमावस्या झाली. तू उद्या निघालीस तरी अष्टमी पर्यंत नक्की पोचशील. करशील ना इतकं? |
| राजकन्या इंदुमती: | (थट्टेने) दादा महाराज, राजे शूरसेन यांनी तर आधीच सगळी योजना तयार करून ठेवली आहे. मला आता कारण द्यायला काही जागा उरली नाही. |
| (सर्व हसतात.) |
Leave a comment