संगीत योगायोग (अंक-1, प्रवेश-4)

(शूरसेनाची छा‌वणी.)
राजा शूरसेन:(प्रवेश करत सोबतच्या सेनापतीला..) सेनापती, तुम्ही जातीने सर्व बंदोबस्त बघा. या व पुढच्या छावणीत संदेशवाहक नेमा. एकूण तीन ठिकाणी आपल्या छावण्या असणार आहेत. त्यात पुरेल अशी रसद, शस्त्रास्त्रे आहेत याची जातीने खात्री करा. सोबत बखरगीर आणि लेखनिकही असू द्या.
सेनापती:जशी आज्ञा, महाराज. (निघून जातो.)
राजा शूरसेन:(अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत आहे. त्याच्या हातात सोनचाफ्याचे फूल आहे. थांबून फूलाकडे बघत, स्वतःशी) अवंतिके, दोन मासांमध्ये तू माझी वाट पाहिली असणार. निश्चितच पाहिली असणार. पण मी तरी काय करू, माझ्या प्रिय अवंती नगरीवर शत्रूचे आक्रमण होणार आहे, युद्ध होणार आहे हे मी तुला कसे सांगू? प्रिये, युद्धाला मी घाबरत नाही, मात्र त्याचा परिणाम निश्चित नसतो. तुझे सांत्वन करायला मी स्वतः यायला हवे, मात्र ते शक्य नाही. माझा निरोप कोणी तुज पर्यंत पोचवला तर किती बरे होईल. (दुःखी होतो.)
संदेश घेऊनी जा रे आता,
अनिल, मेघ, वर्षा, चंद्रमा,
कोणी तरी न्या संदेश सत्वरा,
निरोप द्या हा मम प्रियेला।

रणाधिर झाले मज रुधीर,
गनिम हा पोहोचे सीमेवर,
मम भान न आता जय-पराजय,
केवळ कर्तव्यासी तत्पर।

शोक नको आता विरहाचा,
कठीण पण होय प्रितीचा,
वीरप्रियेसम दे तू मजला,
निरोप विजयाचा।

दूत होऊनी जाये जो आता,
त्यांस विरहाचे दुःख न होवो,
प्रितीचा वर्षाव त्यासी लाभो,
मजवरी ऋण हे जन्मभरा।।
(दुःख आवरतो.)
सौमित्र प्रवेश करतो. त्याच्या सोबत एक मांड-चोळणा, अंगरखा घातलेली, केस झाकलेली, शस्त्रधारी तरूणी आहे.)
राजा सौमित्र:शूरसेना, मित्रा, कसा आहेस?
राजा शूरसेन:ये सौमित्रा, ये. मी तुझीच वाट बघत होतो. शत्रूने चांगलीच तयारी केली आहे चढाईची. लढाई निकराची होईल असे दिसतेय.
राजा सौमित्र:होय. म्हणूनच मीही जातीने आलोय. दोन मासांपूर्वी जेव्हा गुप्तहेराने पहिल्यांदा ही माहिती आणली तेव्हापासून मी यात लक्ष घालून आहे.
राजा शूरसेन:माझीही शत्रूच्या सर्व हालचालींवर बारीक नजर होती. माहिती मिळाली म्हणून तातडीने कामाला लागता आले. तुझा मी आभारी आहे सौमित्रा. आपापसातील महत्त्वाच्या माहितीचे आदान-प्रदान व्हावे या हेतूने तू दोन्ही राज्यांत जे करार करवून घेतले त्याचीच ही फलशृती.
राजा सौमित्र:आभार कसले मित्रा! आपण मित्र आहोत व नेहमी राहू. मात्र याचे श्रेय माझ्या धाकट्या बहीणीला, इंदुमतीला दे. तिनेच हे करार करायला सुचवले होते.
राजा शूरसेन:नक्कीच. (शूरसेन कौतुकाने इंदुमतीकडे पाहतो. दोघेही एकमेकांना अभिवादन करतात.)
राजा सौमित्र:आता जरा युद्धनितीची चर्चा करू. वर्तला नदीच्या दक्षिण काठावरची छावणी तू सांभाळणार आहेस. मला वाटते, पूर्वेची छावणी मी सांभाळावी. यामुळे शत्रूने येण्याचे दोन महत्त्वाचे मार्ग आपण बंद करू. या दोन्ही छावण्यांना विविध वस्तूंची कुमक पुरवण्यासाठी काही अंतरावर मागे आणखी एक छावणी असावी. दुसरे म्हणजे वर्तला-वर्णिकेच्या संगमावर एक बारीक फट राहतेय. बाकी सर्व ठिकाणी काही ना काही बंदोबस्त आहे. मात्र हा भाग अति-डोंगराळ व चिंचोळा आहे. इथे आपल्याकडून प्रतिकाराची काहीच तयारी नाही.
राजा शूरसेन:(सर्तकतेने) ही बाब माझ्या लक्षातच आली नव्हती.
राजा सौमित्र:माझ्याही लक्षात आली नव्हती. इंदुमतीने ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. (इंदुमतीकडे कौतुकाने निर्देश करत) या आघाडीवर इंदुमतीला नेमावे, असे मला वाटते. तिला या भागाची उत्तम माहिती आहे.
राजा शूरसेन:परंतु..
राजा सौमित्र:तिला शस्त्रेही उत्तम चालवता येतात. तिच्याकडे स्वतःचे सैन्य आहे. तिच्या क्षमतेबद्दल शंका नको.
राजा शूरसेन:मला तिच्या क्षमतेबद्दल शंका नाही. मात्र, राजस्त्रीयांनी शस्त्र हाती घ्यावे हे मला मान्य नाही.
राजकन्या इंदुमती:(नम्रपणे) आणि जेव्हा राजा धरातीर्थी पडतो, तेव्हा त्याच्या आश्रयाने जगणाऱ्या स्त्रीयांनी स्वतःचे रक्षण कसे करावे? स्त्री ही निश्चितच घरची लक्ष्मी आहे. मात्र हे केवळ तिचे शील सुरक्षित असे पर्यंतच. दुर्दैवी परिस्थितीमध्ये तिने स्वतःचे रक्षण करायला नको का?
राजा सौमित्र:मित्रा, मलाही हेच वाटते. तू निश्चिंत राहा आणि इंदुमतीवर ही कामगिरी सोपव. आता विचार करायलाही अवधी नाही.
राजा शूरसेन:ठीक आहे. इंदुमती, मी तुझ्यावर ही कामगिरी सोपवतो. तू तातडीने रवाना हो. मार्ग बिकट आहे. स्वतःला जप.
राजकन्या इंदुमती:(शूरसेनाला अभिवादन करते. सौमित्राला अभिवादन करते.) दादा, निघते मी.
राजा सौमित्र:यशस्वी भव. (शूरसेनाला) आपणही निघुया.
राजा शूरसेन:होय.
(तिघेही जातात.)