संगीत योगायोग (अंक-1, प्रवेश-1)

(वर्णिका नदी काठचा रम्य परिसर. राजा जयसेन आणि मंत्री विप्लव येतात.)
राजा जयसेन:आहाहा! किती हा रम्य परिसर ! जणू नंदनवनच ! ही वर्णिका नदी आम्हाला नेहमीच गंगेच्या शांत, संयमी प्रवाहाची आठवण करून देते. तशी ती काही ठिकाणी नवतरूणी सारखी अवखळही आहे. निधड्या छातीच्या वीराची तलवार कोसळावी तशी कोसळतेही. तिची ही विविध रूपे मन मोहून घेतात. ही वनराजी, धरेचे हे विपूल वैभव कोणालाही मुग्ध करेल. मंत्री विप्लव, मला या प्रदेशाची आणखी माहिती सांगा.
मंत्री विल्पव:महाराज जयसेन यांचा विजय असो. महाराज, वर्णिका नदीच्या काठचा हा परिसर. या ठिकाणी चार राज्यांच्या सीमा मिळतात. आपले त्रिवर्ण राज्य, राजा इंद्रजीताचे कणव राज्य, राजा शूरसेनाचे अजेय राज्य आणि राजा सौमित्राचे सुमित्र राज्य. या सुजलाम् सुफलाम् प्रदेशामुळे या चारही राज्यांच्या राजधानीची नगरे याच परिसरात वसलेली आहेत. या भागांतून या चारही राज्यांच्या राजधान्यांना जाता येते. वर्णिका नदीचा हा परिसर अतिशय रम्य आणि सुपिक आहे. या भागात शांतता नांदली तर सर्व राज्यांची प्रगती होईल हे हेरून दोन पिढ्यांपूर्वी या चारही राज्यांमध्ये हा युद्धशून्य भाग असल्याचा करार झाला होता. या कराराचा भाग म्हणून चारही राज्ये एकमेकांवर हल्ला करणार नाही आणि इतरांच्या शत्रूंना मदत करणार नाही हे सुद्धा मान्य झाले होते. सर्व राज्यांतील राजसदस्य या परिसरात विहाराला येतात. जेव्हा एखादा राजा आपल्या राणीवशासोबत इथे येतो तेव्हा तो आपले निषाण लावतो. अशा वेळी इतर राजे व त्यांचे पदाधिकारी निकडीच्या कामाव्यतिरिक्त इथे येत नाहीत. तसेच परिसराबाहेरच्या रस्त्याचा वापर करतात.
राजा जयसेन:म्हणून आम्हाला इथे आणण्यासाठी आपण अवधी मागून घेतला होता? म्हणजे आम्ही इथले सर्वात शक्तिशाली, बलाढ्य राजे असूनही आम्हाला हा नियम लागू होतो तर!
मंत्री विप्लव:महाराज, कराराचा आदर सर्वांनी करणे उचित नाही का? निरोप गेल्यावर सर्व राजांनी तात्काळ संमती दिली हेही खरेच आहे. आपले राज्य बलाढ्य आहे याची जाणीव सर्वांना आहे. आपल्याबद्दल त्यांच्या मानत उचित आदर देखील आहे.
राजा जयसेन:राणीवशाने लागलीच विनंती मान्य केली हे विशेष. (हसतो.) नाही तर इथून लवकर निघणे काही आमच्याने झाले नसते.
मंत्री विप्लव:केवळ सौमित्र राजाचा राणीवसा आहे. राजा सौमित्र इकडे फारसे फिरकत नाहीत. राजा शूरसेन आणि राजा इंद्रजीत हे दोघेही राजे अजून अविवाहीत आहेत.
राजा जयसेन:विल्पवा, तू केवळ माझा मंत्रीच नाही तर चांगला मित्र देखिल आहेस. म्हणून मी तुला माझ्या मनातील विचार बोलून दाखवतो. माझ्या धाकट्या भगिनीच्या, अवंतिकेच्या विवाहाची जबाबदारी मातोश्रींनी माझ्यावर टाकली आहे. तिच्यासाठी एखादा शूर, साहसी राजा वर म्हणून निवडावा असे वाटते. त्यामुळे या तरूण राजांबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. तेव्हा, तू मला या दोघांची माहिती सांग.
मंत्री विप्लव:महाराज, राजा शूरसेन नावाप्रमाणेच शूर आहे. अजेय राज्याच्या परंपरेबद्दल त्याला सार्थ अभिमान आहे. दोन पिढ्यांपूर्वी त्यांच्या राज्याचा बहुतांश भाग म्लेंच्छांनी बळकावला होता. तो राजा शूरसेनाने परत मिळवला.
अजेय नगरीचा अजेय राजा।
शूरसेन अवंतीचा तारा।
पित्याने दिली नगरे बारा।
वाढविला त्याने हा पसारा।
आजवर जे शक्य न झाले, म्लेंच्छांकडीले राज्य मिळवले।
भक्कम बाहू, शस्त्र निपुण हा।
मित्र त्रिवर्णाचा।।
राजा जयसेन:वाह, वाह! राजा शूरसेन खरोखरच शूर आहे.
मंत्री विप्लव:होय, महाराज. शौर्याच्या बाबतीत त्यांची तुलना केवळ आपल्याशी होऊ शकते.
राजा जयसेन:आणि राजा इंद्रजीताबद्दल तुमचे काय मत आहे?
मंत्री विप्लव:राजा इंद्रजीत अत्यंत कर्तव्यदक्ष राजा आहे. न्यायी आहे. आपल्या राज्याची भरभराट करून घेणे हे तो उत्तम जाणतो. सुशील व संयमी असल्याने त्याला फार शत्रू असल्याचे ऐकिवात नाही.
साजे जैसा नभात चंद्र, अलकापुरी साजे तो इंद्र।
उत्तम राजा, कुशल प्रशासक।
सुजाण राजा, सजग प्रजा ही।
दोघेही कर्तव्य परायण।
या राजाच्या हाती दिसते।
मज भविष्य आश्वासक।।
(जयसेन स्वतःशी विचार करत थोडा दूर जातो. स्वतःशी राजा इंद्रजीताचे वर्णन गुणगुणतोय. काही तरी विचार पक्का करून परत येतो.)
राजा जयसेन:विल्पवा, अवंतिकेचे पाणिग्रहण करण्यासाठी राजा इंद्रजीताला आमंत्रित करावे, असे मला वाटते. तू तातडीने माझा निरोप राजा इंद्रजीताकडे न्यावा आणि लवकरात लवकर आपण हे शुभ कार्य हाती घ्यावे, असे मला वाटते.
मंत्री विप्लव:महाराज, आपण मला मित्र मानता खरे, मात्र राजाला कोणीही मित्र नसतो. आपण मला मित्र मानता यात मी माझा गौरव समजतो. आपली हरकत नसेल तर मला खरं काय वाटते ते मी सांगू इच्छितो.
राजा जयसेन:निःसंदेह मनाने बोल. तुझा सल्ला मला मोलाचा वाटतो.
मंत्री विप्लव:महाराज, राजा इंद्रजीत अलिकडेच राजगादीवर बसले. ते उत्तम प्रशासक आहेत, याबद्दल कोणतीही शंका नाही, मात्र अजून रणांगणावरचा त्यांचा पराक्रम काही ऐकिवात नाही. तसेच कणव राज्याच्या उत्तर व पूर्वेकडील सीमा आपले पिढीजात शत्रू राजा वीरभद्र यांच्या राज्याशी मिळतात. या दोहोंचे संबंध कसे आहेत, याची माहिती घेणे रास्त ठरेल. आणि महाराज …
राजा जयसेन:आणि काय विप्लवा?
मंत्री विप्लव:महाराज, राजकन्या अवंतिकेची संमतीदेखिल महत्त्वाची आहे.
राजा जयसेन:(कठोर होत) आमच्या भगिनीसाठी काय योग्य नि काय नाही, ते आम्ही भले जाणतो मंत्री विप्लव. विवाहासाठी तिची संमती आम्हाला आवश्यक वाटत नाही. आता राहिला प्रश्न राजा इंद्रजीताच्या पराक्रमाचा आणि राजा वीरभद्र व राजा इंद्रजीत यांच्या संबंधांचा. याची माहिती काढण्यासाठी तुम्ही आजच हेर रवाना करा.
मंत्री विप्लव:जशी आज्ञा, महाराज.
(त्याच वेळी गुप्तचर वार्ता घेऊन येतो.)
गुप्तचर:महाराजांचा विजय असो.
मंत्री विप्लव:बोल निष्णात. कोणती वार्ता आणली?
गुप्तचर:स्वामी, राजा शूरसेनाने वर्तला नदीच्या परिसरातील म्लेंच्छांचे वर्चस्व असलेला जो भाग जिंकला होता, तो परत मिळवण्यासाठी शत्रूने स्वारी करण्याचे योजले आहे. लढाईची पूर्वतयारी म्हणून मार्गाची पहाणी करण्याची आज्ञा नुकतीच दिली गेली. प्रत्यक्षात लढाई व्हायला मास – दोन मासांचा अवधी जाईल. चढाई दक्षिणेकडून म्हणजे सुमित्र राज्याच्या सीमेकडून होण्याची शक्यता आहे.
मंत्री विप्लव:(हातातील कडे गुप्तचराला देत) शाब्बास! आता जाऊन विश्राम कर. आणि पौर्णिमेला परत येऊन भेट मला.
(गुप्तचर जातो. महाराज जयसेनाकडे वळत..) महाराज, आपण आज्ञा करावी.
राजा जयसेन:शत्रूच्या हालचालींची, सैन्यबळाची माहीती मिळवण्यासाठी निष्णात गुप्तचर आजच रवाना करा.
मंत्री विप्लव:जशी आज्ञा, महाराज.

6 responses to “संगीत योगायोग (अंक-1, प्रवेश-1)”

  1. Saraswati Bhosale Avatar
    Saraswati Bhosale

    छान च आहे.आता पुढे काय होईल याची उत्कंठा वाढली.

    Liked by 1 person

  2. मस्त लिहिले

    Liked by 1 person

    1. अमित जोशी Avatar
      अमित जोशी

      छान लिहिले आहे. लिहायचा tempo छान जमला आहे. 👍

      Liked by 1 person

      1. धन्यवाद !! 🙏🏻

        Like

Leave a reply to nirmiteepublication Cancel reply