लाडू महाराज

[ही कथा Booksanstories च्या ‘पांथस्थ’ या ई-कथा संग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे.]

एक लाडू महाराज होते. तसे ते प्रसिद्ध होते. अनेक लोक त्यांना ओळखत होते, त्यांचे भक्त होते. पण हे सर्व एका मर्यादित वर्तुळातच. वर्तुळाबाहेरचे जग जणू परके जग, आपले नसलेले. या वर्तुळाबाहेरच्या लोकांशी लाडू महाराज संवाद जरूर साधत, परंतु त्यांनी या वर्तुळात यावं या करिता. ‘यावं या करिता च’ असं म्हणता येऊ शकतं, मात्र आपण का त्यांच्यावर टीका करावी? तसे काही लाडू महाराज फार ‘conservative’ नव्हते.

त्यांच्या नावाची सुद्धा एक गंमतच होती. म्हणजे त्यांच्या तरुणपणी असतील ते कोणी अमुक कुमार किंवा तमुक कुमार. परंतु, त्यांना एक सिद्धी प्राप्त झाली होती. त्यावरून त्यांचे नाव ‘लाडू महाराज’ पडले. तर, त्यांच्या तरुणपणी ते एकदा लाडू नगरीमध्ये गेले होते. नावाप्रमाणेच विविध लाडवांनी सजली होती लाडू नगरी. अगदी घरच्या रवा लाडूपासून ते शाही मोतीचूर लाडवांपर्यंत सर्व प्रकारच्या लाडवांची रेलचेल होती. अशा या लाडू नगरीत असताना लाडू महाराजांना या लाडवांचे दुष्परिणाम जाणवले व एकही लाडू न खाता ते परतले. भल्या भल्यांना शक्य झालं नाही ते त्यांनी अगदी सहजरित्या करून दाखवलं होतं, तेही ऐन तारुण्यात !

तर असे हे लाडू महाराज व्याख्यानं देत, शिबिरं घेत. लाडू नगरीतून उत्पन्न झालेलं हे लाडू-लोण आपल्या नगरीत कसं फोफावतंय आणि आपल्या संस्कृतीला कसं नष्ट करतंय हे ते हिरीरीने मांडत. सर्वांनी बाजारातील सर्व प्रकारच्या लाडवांवर बहिष्कार घालणं कसं आवश्यक आहे हे ही ते पटवून देत. लाडू बनवण्याच्या पवित्र कामाला आपल्याच हावरटपणामुळे कसं बाजारू स्वरूप आलं आहे हे ते पोटतिडकीने सांगत. लोकही हे सर्व फार तन्मयतेने ऐकत. अशी शिबिरं सर्वांच्या सोयीसाठी शनिवारी- रविवारी जोडून असायची. मग लाडू महाराज लाडूंच्या फोलपणाबद्दल जमके भाषण करत, सत्र घेत. भारावलेल्या मनःस्थितीत सर्व भाषण ऐकत. ऐकून झाल्यावर एकमेकांमध्ये चर्चा करताना लाडवांच्या भीषण बाजूकडे एकमेकांचे लक्ष वेधत. लाडू महाराजांचा एकदिलाने जयजयकार करत. शिबिर संपल्यावर लोक आवर्जून लाडू महाराजांना भेटत व ‘किती ती अवघड गोष्ट व तुम्हाला कसं ते जमलं’, असं म्हणत स्वतःला ते जमणं किती कठीण हे ही नमूद करत. स्वतःमध्ये फार बदल करावे न लागता आपण लाडू महाराजांच्या वर्तुळात कसे टिकून राहू, हे सर्व लोक व्यवस्थित जाणून होते. असे जाणकार लोक लाडू महाराजांचे विचार आचरणात आणण्यापेक्षा त्यांना देवत्व बहाल करून त्यांची पूजा करण्यात धन्यता मानायचे.

तर हे लोक व्याख्यानं ऐकून weekend साजरा करायला रात्री हॉटेलमध्ये जाऊन विविध लाडवांची ऑर्डर देत आणि लाडू महाराजांचा जयजयकार करत लाडवांवर मनसोक्त ताव मारत.

लाडू महाराजांच्या अनेक भक्तांमध्ये विवेक व धृती हे जोडपं होतं. हे काही आंधळे भक्त नव्हते. त्यांनी लाडू महाराजांची अनेक व्याख्याने ऐकली होती, पुस्तकं वाचली होती. दोघांनाही लाडू महाराजांबद्दल अपार आदर होता. लाडू महाराज लाडवांबद्दल प्रबोधनच करतात असं नसून ते स्वतःही त्याप्रमाणे वागतात हे त्या दोघांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे होते. तर एका पूर्व नियोजित वेळी विवेक, धृती व त्यांचा पाच वर्षांचा मुलगा निरागस, असे लाडू महाराजांना भेटायला त्यांच्या आश्रमात गेले. ते जाणार हे समजताच शेजारच्या धांदूल मामांनी त्यांच्यासोबत लाडू महाराजांसाठी भेट म्हणून उत्तम प्रतीचे बुंदी लाडू विकत घेऊन दिले. धृतीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र धांदूल मामांच्या लक्षात हा विरोधाभास काही येईना. विवेकच्या सांगण्यावरून तिने नाद सोडला.

विवेक, धृती व निरागस यांचं छान स्वागत झालं. ओळख करून घेण्याचे सोपस्कार झाले. गप्पा झाल्या. बाजारात केवळ वेगवेगळ्या प्रकारचे लाडूच मिळत असताना लाडू महाराजांच्या पत्नीने कसा बरं आश्रम थाटला, याचं दोघांनाही कौतुक वाटलं. बोलता बोलता त्यांच्या लक्षात आलं की खरं तर लाडू कोणताही असू देत, तो विकत न आणता आपणच बनवला पाहिजे असं लाडू महाराज व त्यांच्या पत्नीचं मत होतं. विवेक व धृती दोघांनाही धांदूल मामांनी भेट म्हणून दिलेल्या लाडवांची आठवण झाली.

“आजकाल घरी कोणालाही काही बनवायला नको. मग सगळे लोक घेतात बाहेरून विकत. मग त्याबरोबर वाढलेला खर्च व आवेष्टनाचा वाढलेला कचरा असतो. आणि किमतीला तर काही सुमारच नाही. आता हेच बघा, बुंदीचे लाडू जर तीनशे रुपये किलो प्रमाणे मिळतात तर उगाच का साडेपाचशे रुपयांचे घ्या?” साजूक तूप, तळणीचं तेल व डाळीचे पीठ यांचा दर्जा चांगला असेल म्हणून असेल ही वाढीव किंमत, असे धृती म्हणणार, तेवढ्यात विवेक ने खुणेनेच ‘नाही’ सांगितलं. धृती थांबली.

आश्रमातील इतर सर्व गोष्टी पाहून झाल्या. प्रश्न झाली, उत्तरं – काही मिळाली, काही नाही मिळाली. बाजारातील लाडवांशिवाय कसा मार्ग काढायचा याची माहिती मात्र बरीच मिळाली. लाडू महाराजांच्या पत्नीने सर्वांना जेवायला बोलावले. सर्वजण पानांवर बसले तसा निरागस ने ‘लाडू पाहिजे’ असा घोषा लावला. ‘आपण ते आजी आजोबांसाठी आणले आहेत, आपण नंतर घेऊ’ असे सांगून धृतीने त्याला शांत केले. ‘पण मग ते खात का नाही ?’ निरागस ने प्रश्न उभा केला. आता मात्र लाडू महाराज प्रचंड अस्वस्थ झाले. ते म्हणाले, ” आम्हाला खायचाच नाही तुमचा बाजारातला लाडू.”

‘पण तुम्ही कधी खाऊन तरी पाहिला आहे का असा लाडू?’ निरागस चा दुसरा प्रश्न आला. ज्या गोष्टीसाठी सारं जग मला ओळ्खतं त्या गोष्टीवर एका पाच वर्षाच्या य:कश्चित पोराने असे प्रश्नचिन्ह उभे करावे या मुळे लाडू महाराजांना प्रचंड अपमानित झाल्यासारखं झालं. आता ती अस्वस्थता विवेक व धृती मध्येही आली. “आता जेवायला बसलो ना आपण, म्हणून नंतर खाऊ आम्ही,” असे म्हणत लाडू महाराजांच्या पत्नीने मध्यस्थी केली.

विवेक व धृती कसे बसे निरोप घेऊन निघाले. निरागस ने उभे केलेल्या प्रश्नांचं त्यांना कौतुकच वाटत होतं. तो जे करायला धजला ते दोघांनाही कधीही जमलं नसतं. त्याला समजवावं असं दोघांनाही वाटत होतं, मात्र कोणी काही बोललं नाही. फार काही वाद न होता पाहुण्यांची बोळवण झाली यामुळे लाडू महाराजांच्या पत्नीने निःश्वास टाकला. खरं तर लाडू महाराजांनी एकदाही बाजारातील लाडू न खाता त्या विरुद्ध इतकी वर्ष ही मोहीम कशी राबवली, हा प्रश्न त्यांच्या पत्नीलाही पहिल्यांदाच पडला. आपण इतकी वर्ष सोबत असूनही आपल्याला कसं लक्षात आलं नाही, आणि त्या चिमुरड्याला पहिल्या भेटीत, तेही इतक्या छोट्या भेटीत कसं बरं लक्षात आलं?

पाहुणे गेल्याबरोबर लाडू महाराजांचा राग उफाळून आला. त्या एवढ्याशा परक्या पोराकडून झालेला आपला अपमान इतक्यात काही ते विसरणं किंवा सोडून देणं शक्यच नव्हतं. इतक्या वर्षांच्या आयुष्यात कोणीही असा सवाल उभा केला नव्हता, त्यामुळे ही शक्यताच त्यांच्या गावी नव्हती. लाडू महाराजांनी त्या मुलावर, त्याच्या पालकांवर व त्या मुलावर झालेल्या संस्कारांवर सडकून टीका केली. त्यामुळे ते जरा शांत झाले.

दिवस मावळला. संध्याकाळचे लाडू-विरोधी आख्यान झाल्यावर पानं वाढली गेली. जेवणात लाडू महाराजांच्या पत्नीने, सकाळी पाहुण्यांनी आणलेले लाडू, लाडू महाराज सोडून इतरांना वाढले. कुजबुजत का होईना मात्र प्रत्येकाने दुसऱ्यांदा लाडू मागत त्या लाडवांप्रति आपली पसंती दर्शवली. लाडू महाराजांच्या नजरेतून हे सुटले नव्हते. जेवणं आटोपली. शतपावली झाली. झोपण्यापूर्वीचे लाडवांची व्यर्थता सांगणारे अभंगही म्हणून झाले.

आश्रमात निजानिज झाली. लाडू महाराजही अपमानाचं शल्य उराशी घेऊन अंथरुणावर पडले. पडल्या पडल्या कधी झोप लागली ते त्यांच्या लक्षातही आले नाही. जरा वेळाने… ते व्याख्यानाची तयारी करायला बसले होते तेवढ्यात तिथे कोणीतरी आलं व अत्यंत आदराने लाडू महाराजांना विकतचा लाडू खायला दिला. त्यांनीही तो अगदी सहज घेतला व खाल्ला. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांना भयंकर पश्चाताप झाला. कोणते तरी महापातक आपल्या हातून घडल्याचा भाव त्यात होता. ते बिथरले, उभे राहिले व जोरजोरात ओरडू लागले. “कोण ते मला पदच्युत करायच्या प्रयत्नात आहे? बोला, कोण आहे?”

“महाराज, महाराज. उठा, उठा. काय झाले? पाणी घेता का?” लाडू महाराजांची पत्नी त्यांना हलवून जागे करत होती. लाडू महाराज थरथर कापत होते व मोठमोठ्याने ओरडत होते. आजूबाजूच्यांना केवळ ‘बोला, कोण आहे?’ ‘बोला, कोण आहे?’ इतकेच ऐकू आले. लाडू महाराजांच्या मुलीने पाणी आणले. मुलाने त्यांना बसते केले. घडले ते केवळ एक दुःस्वप्न होते हे समजल्यावर ते जरा शांत झाले. जणू काही झालेच नाही, असे भासवत ते झोपी गेले. आश्रमात इतर कोणीही त्याबद्दल विचारायचा प्रयत्न केला नाही. ते ही झोपी गेले.

पुढचे काही दिवस लाडू महाराज जरा विचित्रच वागत होते. भेटायला येणाऱ्यांना, भेट म्हणून काहीही आणू नये अशी ताकीद दिली. भेटणाऱ्यांना केवळ स्वतःबद्दल चे प्रश्न मांडण्याची परवानगी होती. इतर कोणतीही चर्चा ते टाळत होते. लहान मुलांना सोबत आणायला बंदी घातली. भेटींचा कालावधीही कमी केला. जेवणाची आमंत्रणं बंद झाली. आता ते एकटेपणात जास्त वेळ घालवत. भक्तांना याचे अपार कौतुक वाटे. लाडू महाराजांच्या अलिप्तपणा चा अर्थ सर्व भक्तांनी ‘समाधीची तयारी’ असा घेतला होता.

लाडू महाराज यांची मात्र वेगळीच व्यथा होती. “आपण कधी विकतचा लाडू खाल्लाच नाही तर आपल्याला त्याची चव कळणार तरी कशी? ती जर माहितच नाही तर इतरांना ती इतकी भुरळ कशी घालते हे तरी आपल्याला कसे समजणार? ते जर आपल्याला माहीतच नाही तर त्यावर टीका करण्याचा त्याला भुललेल्या लोकांना दोष देण्याचा अधिकार तो काय मला? पण मग आपली तपश्चर्या व्यर्थ आहे का? इतके वर्ष आपण या वेढून घेणाऱ्या प्रलोभनापासून स्वतःला शर्थीने दूर ठेवलं आहे तर याचं काही फळ नको का मिळायला? पण मग माझा जर तो अनुभवच नाही तर मी बोलावं का त्याबद्दल?”

उत्तर काही सापडत नव्हतं. शेवटी लाडू महाराजांनी निश्चय केला. एकदिवस आश्रमात नेहमीप्रमाणे निजानिज झाल्यावर लाडू महाराज उठले व त्यांनी स्वयंपाक घरात ठेवलेला विकतच्या लाडवांचा डबा काढला. त्यातील एक लाडू खाल्ला. ती चव खरोखरच उत्तम होती. बनवणाऱ्यानेही मन लावून बनवले असावेत. एकेक घास आनंद देत होता. लाडू पूर्ण खाऊन झाल्यावर लाडू महाराज तृप्त होऊन उठले.

दुसऱ्या दिवसापासून लाडू महाराज पूर्ण बदलले. ते आता टीका कमी करायचे. लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय सांगायचे. ‘लाडू विरोधी’ अशी टोकाची भूमिका सोडून ‘सीमित लाडू उपभोग’ अशी नवी भूमिका धारण केली. व्याख्यानांऐवजी मर्यादित लोकांची चर्चासत्रे घेऊ लागले.

लाडू महाराजांच्या पत्नी साठी अचानक गायब झालेला बुंदी लाडू हे जेवढे गुढ होते, तेवढाच लाडू महाराजांमधला हा बदल इतर सर्वांसाठी गुढ होता.

2 responses to “लाडू महाराज”

  1. खूप छान…..प्रतीकात्मक लिहिलयस….लिहीत रहा…मोहिनी…

    Liked by 1 person

    1. Thank you soooo much! 😃

      Like

Leave a reply to nirmiteepublication Cancel reply