संगीत योगायोग (अंक-3,प्रवेश-3)

(राजा जयसेनाचे दालन. राजा जयसेन आणि मंत्री विप्लव उपस्थित आहेत. राजा जयसेन येरझाऱ्या मारत आहेत. मंत्री विप्लव शांतपणे उभे आहेत. राजा जयसेन मधेच थांबतात.)
राजा जयसेन:विप्लवा, तू जातीने खात्री केलीस ना, राजा इंद्रजीत निघाले आहेत ना कमल महालातून?
मंत्री विप्लव:होय, महाराज. आताच शिपाई वार्ता घेऊन आला की राजे इंद्रजीत कमल महालाच्या उद्यानातून इकडे यायला निघाले आहेत.
राजा जयसेन:विप्लवा, अरे पण तू का नाही थांबला त्यांच्यासोबत.
मंत्री विप्लव:महाराज, आम्ही कमल महालाजवळ जात असता, मला दूरवर गोंधळ ऐकू आला, त्याची चौकशी करण्यासाठी मी गेलो होतो. आणि महाराज, माझ्या उपस्थितीत जर राजकन्या अवंतिका संकोचली असती आणि बोलली नसती तर…
राजा जयसेन:बरं, बरं. कारण काहीही असो, पण त्यांना असे एकटे सोडणे बरे नाही. त्यांना वाट दाखवण्यासाठी सोबत कोणी आहे ना?
मंत्री विप्लव:होय महाराज. आपण निश्चिंत असावे. मी सेवकाला सूचना दिल्या आहेत.
राजा जयसेन:ठीक आहे. आपण त्यांची वाट बघू.
मंत्री विप्लव:जशी आज्ञा, महाराज.
(राजा इंद्रजीत, मंत्री वृषकेतु प्रवेश करतात.)
राजा जयसेन:(इंद्रजीताच्या मुखावरील आनंद बघून उल्हसित होतो) या राजे या. झाली का मग भेट अवंतिकेची?
राजा इंद्रजीत:(हसून) महाराज, राजकन्या अवंतिकेची भेट झाली की नाही हे तर मला सांगता येणार नाही, मात्र माझ्या प्रियेची भेट नक्कीच झाली मला.
राजा जयसेन:(अवंतिका इंद्रजीताला आवडली आहे, असे समजून) उत्तम! अति उत्तम! मग तर मला लगेच कामाला लागले पाहिजे. मंत्री विप्लव, पुरोहितांना बोलावून घ्या. अगदी पहिलाच मुहुर्त निवडा या शुभकार्यासाठी.
मंत्री विप्लव:जशी आज्ञा, महाराज.
मंत्री वृषकेतु(हात जोडून) महाराज, अलकापुरी येथील राजपुरोहितांना आमंत्रित करण्याची संमती मिळावी.
राजा जयसेन:अवश्य, अवश्य. मंत्री वृषकेतु, तुम्ही तातडीने स्वार रवाना करा. (इंद्रजीताकडे बघत) राजे इंद्रजीत, आपण थोडा वेळ विश्रांती का घेत नाही?
राजा इंद्रजीत:होय महाराज.
(राजा इंद्रजीत, मंत्री वृषकेतु जातात. मंत्री विप्लव त्यांना निरोप देऊन परत येतो.)
(सैनिक धापा टाकत प्रवेश करतो.)
सैनिक:महाराजांचा विजय असो. महाराज, राजा शूरसेन….
राजा जयसेन:(खुषीत येऊन) काय म्हणताय राजा शूरसेन?
सैनिक:महाराज, ते इकडेच येत आहेत. सोबत राजकन्या अवंतिका देखिल आहे.
राजा जयसेन:इकडे येत आहेत? सोबत राजकन्या अवंतिका आहे? कसे शक्य आहे, आताच तर राजे इंद्रजीत अवंतिकेला भेटून आलेत.
सैनिक:महाराज, राजा शूरसेन यांनी राजकन्या अवंतिकेचे हरण केले.
राजा जयसेन:तू खरं सांगोतस ना?
सैनिक:होय, महाराज. सेनापतींनी मला तातडीने हा निरोप तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी धाडले.
राजा जयसेन:(सैनिकाला) जा तू. (चिडून) मंत्री विप्लव, हे आम्ही काय ऐकतोय? दिवसा ढवळ्या कोणीही यावे आणि राजकन्येचे हरण करावे. हे काय चालले आहे! सेनापतींना सांगा की आता जाऊन त्या शूरसेनाला बंदी करून आणा माझ्यासमोर.
मंत्री विप्लव:महाराज, जरा धीराने घ्या. महाराज, राजकन्या अवंतिकेचे हरण झाले आहे अथवा ती स्वतःच्या मर्जीने राजा शूरसेन यांच्या बरोबर गेली, हे आपल्याला माहित नाही.
राजा जयसेन:मंत्री विप्लव, तुम्ही हे काय म्हणताय?
मंत्री विप्लव:होय महाराज, असेही असू शकते की राजकन्या अवंतिकेला राजा शूरसेन यांच्याशी विवाह करायचा होता, आणि आपण मात्र तिचे मत विचारात न घेता तिचा विवाह राजा इंद्रजीत यांचेशी ठरवला.
राजा जयसेन:म्हणून काय शूरसेनाने राजकन्येचे हरण करावे?
मंत्री विप्लव:महाराज, आपण राजकन्येसाठी शूर वर शोधत होता आणि राजा शूरसेनाने आपल्या शौर्याचा पुरेसा पुरावा दिला आहे. आपण त्यांना राजकन्या अवंतिकेसाठी योग्य वर नक्कीच मानू शकता.
राजा जयसेन:राजकन्येचे हरण करणे हा काही शौर्याचा पुरावा होऊ शकत नाही. तुम्ही ताबडतोब जा आणि शूरसेनाला बंदी बनवून आणा.
मंत्री विप्लव:महाराज, आपण असे करू नये.
राजा जयसेन:मंत्री विप्लव, माझ्या आज्ञेचा तुम्ही अव्हेर करताय.
मंत्री विप्लव:क्षमा असावी, महाराज.
राजा जयसेन:(क्रोधाने) अजिबात क्षमा करणार नाही.
मंत्री विप्लव:महाराज, आपण मला क्षमा करा वा नका करू, मात्र राजा शूरसेन व राजकन्या अवंतिकेला अवश्य क्षमा करा.
राजा जयसेन:(क्रोधाने) आरोपीचा मित्र होतोस! विप्लवा, तू माझा मित्र नसतास तर मी तुझ्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला असता.
(राजा शूरसेन आणि राजकन्या अवंतिका प्रवेश करतात.)
राजा शूरसेनमहाराज, मी शूरसेन. मी आपणहून आलोय आपल्याकडे. आपण मला बंदी बनवा.
राजकन्या अवंतिका:दादा, मलाही बंदी बनव.
राजा शूरसेनअपराधी मी अपुला,
शिक्षेस पात्र मी सर्वथा,
ठेवून पराक्रम तुमच्या चरणी,
क्षमा मागतो मी नृपाळा।
राजकन्या अवंतिका:मीही शामिल या कृत्यासी,
भान असे मी सम-अपराधी,
उदार हृदये तू आम्हाला,
बंधूराजा, घे हृदयासी।।
राजा जयसेन:(क्रोधाने) हे काय सुरु आहे?
मंत्री विप्लव:महाराज, कृपया शांत व्हा. किमान एकदा या दोघांचे म्हणणे तरी ऐकून घ्या.
राजकन्या अवंतिका:दादा, राजा शूरसेन यांच्यासोबतच विवाह करण्याचे मी ठरवले होते. त्यामुळे, जेव्हा माझे मत विचारात न घेता, तुम्ही माझा विवाह निश्चित केला, तेव्हा मीच राजा शूरसेन यांना माझे हरण करावे असे सुचवले. माझे काही राजा इंद्रजीत यांचेबरोबर वैर नाही, मात्र मी विवाहासाठी राजा शूरसेन यांना निवडले होते.
राजा जयसेन:(चिडून) आणि तुझ्या सांगण्यावरून राजा शूरसेन तुला न्यायला आले.
राजा शूरसेनअवंतिकेचा निरोप मिळताच, मी लवकरात लवकर तिला आणण्यासाठी निघालो. आम्ही वर्तला नदीच्या जवळ असताना, राजा वीरभद्राचे सैन्य नदी ओलांडण्याच्या तयारीत दिसले. त्रिवर्ण राज्याला मदत करण्याच्या कराराला आणि अवंतिकेला स्मरून मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी न होता, शत्रूला परतवण्यात आम्हाला यश आले.
मंत्री विप्लव:होय महाराज, आपले सैन्य पोचण्याआधीच राजा शूरसेन यांनी शत्रूला पळवले होते.
राजा जयसेन:(आश्चर्याने) काय सांगतोस काय? मोजक्या सैन्यानिशी मोठ्या संख्येने असलेल्या शत्रूचा त्यांनी धुव्वा उडवला म्हणतोस? (राग मावळतो.) वाह, वाह. उत्तम, अति-उत्तम.
मंत्री विप्लव:महाराज, राजा शूरसेनाच्या कर्तुत्त्वामुळे त्यांच्यावरचा तुमचा रोष मावळलाय, असे म्हणायला हरकत नाही.
राजकन्या अवंतिका:(जयसेनाजवळ जात) मला वाटलेच होते दादा, तुम्ही फार वेळ राजा शूरसेन यांच्यावर राग धरू शकणार नाहीत.
राजा जयसेन:(हसून) हो तेही खरेच. मात्र राजा इंद्रजीत यांना हे सर्व कसे सांगायचे?
मंत्री विप्लव:महाराज, त्यांना काही सांगण्याची गरज पडेल असे वाटत नाही.
(राजा इंद्रजीत प्रवेश करतो.)
राजा इंद्रजीत:महाराज, मला हे सर्व काही या आधीच समजले.
राजा जयसेन:(आश्चर्याने) असे होय! तुम्हाला हे सर्व कसे समजले ते मी नंतर विचारेन. मात्र जीला तुम्ही राजकन्या अवंतिका म्हणून भेटलात ती आर्या कोण?
(इंदुमती प्रवेश करते.)
राजकन्या इंदुमती:(हात जोडून) महाराज, मीच ती, सुमित्र देशाची राजकन्या, राजा सौमित्राची धाकटी भगिनी, राजकन्या इंदुमती. राजकन्या अवंतिकेच्या सांगण्यावरून मी राजा शूरसेन यांचे बरोबर तिला नेण्यासाठी आले होते. मात्र, विधिलिखीत काही वेगळेच होते, म्हणून थांबले आणि माझी राजा इंद्रजीत यांच्याशी गाठ पडली. (राजा इंद्रजीताशेजारी जाऊन ऊभी राहते.)
राजा जयसेन:इंदुमती! म्हणजे म्लेंच्छांविरद्धच्या लढाई मध्ये राजा शूरसेनाला मदत करणारी सौदामिनी तूच तर?
मंत्री विप्लव:होय, महाराज. हिचेच कौतुक करायचे होते तुम्हाला. (इंदुमती हात जोडते.)
(राजा सौमित्र आणि मंत्री वृषकेतु प्रवेश करतात.)
राजा इंद्रजीत:मंत्री वृषकेतु, आपण तर राजा सौमित्रांना इथेच घेऊन आलात.
राजा सौमित्रतर, तर! आमच्या भगिनीची निवड बघायला आम्ही जातीने हजर झालो. राजा जयसेन, आपल्या दोन्ही भगिनींनी उत्तम साथीदार निवडले आहेत.
राजा जयसेन:खरं आहे. राजा शूरसेन आणि राजा इंद्रजीत, दोघांनीही पराक्रमाच्या जोरावर विजय मिळवले आहे, याबद्दल त्यांचे कौतुकच आहे.
राजकन्या अवंतिका:
राजकन्या इंदुमती:
राजा इंद्रजीत:
राजा शूरसेन:
मंत्री विप्लव:
कर्म – कर्तव्य अपुल्या हाती,
कार्यसिद्धीचे पडो मग दान।
ईश्वरावर सोपवून सारे,
घडतील हाती कार्य महान।

यत्न – प्रयत्न पूर्ण करावे,
न ठेवावी उणिव जरा।
योगायोग असे बाकी सारे,
आत्मविश्वास तोची खरा।

निश्चित असता ध्येय अपुले,
संकट-सागर लंघून होई।
निश्चल असता अपुली मति
दैव सर्वथा अनुकुल होई।।
(सौनिक प्रवेश करतो.)
सैनिक:महाराजांचा विजय असो! महाराज, राज-पुरोहीतांनी निरोप धाडला आहे. विवाहाचा शुभमुहुर्त निघाला आहे.
राजा जयसेन:राज-पुरोहितांना सांग, इथे आता एक नाही तर दोन विवाह सम्पन्न होणार आहेत.
(सर्व हसतात. पडदा पडतो.)
(समाप्त)

Leave a comment