संगीत योगायोग (अंक-3,प्रवेश-1)

(राजा जयसेनाचे दालन. राजा जयसेन आणि मंत्री विप्लव उपस्थित आहेत.)
राजा जयसेन:मंत्री विप्लव, राजा इंद्रजीत येण्याची तिथी आजचीच ना?
मंत्री विप्लव:होय, महाराज. राजा इंद्रजीत येण्यातच आहेत.
(सैनिक प्रवेश करतो.)
सैनिक:महाराजांचा विजय असो. महाराज, दोन तातडीचे निरोप आहेत. राजा वीरभद्र आपल्यावर चाल करून आलेत. त्यांच्या सैन्याच्या तीन तुकड्या वर्तला नदी ओलांडण्याच्या बेतात आहे.
मंत्री विप्लव:आणि दुसरा निरोप?
सैनिक:राजे इंद्रजीत नगरीमध्ये दाखल झाले आहेत.
राजा जयसेन:ठीक आहे. तू जा. (सैनिक जातो.) मंत्री विप्लव, जा आणि सेनापतींना तातडीने युद्धावर निघण्याचा निरोप द्या. आणि राजा इंद्रजीत यांना सन्मानाने घेऊन या.
मंत्री विप्लव:जशी आज्ञा, महाराज.
(मंत्री विप्लव जातो.)
राजा जयसेन:(स्वतःशी) अशी अनामिक हुरहुर ती का वाटावी? इतक्या लढाया आम्ही लढलो, इतकी युद्ध जिंकली मात्र या आधी कधी अशी हुरहुर नाही वाटली. असे वाटते, जणू फार आश्चर्यकारक असे काही घडणार आहे.
(मंत्री विप्लव, राजा इंद्रजीत, मंत्री वृषसेन प्रवेश करतात.)
राजा इंद्रजीत:
मंत्री वृषसेन:
प्रणाम महाराज. (राजा इंद्रजीत आणि मंत्री वृषसेन नमस्कार करतात.)
राजा जयसेन:या, या राजे इंद्रजीत. आपण आलात, आणि आमचे मन प्रफुल्लीत झाले. आपला संदेश मिळाला आणि आपल्याला भेटण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो. आपला पराक्रम आम्ही ऐकून आहोत. आज प्रत्यक्ष भेटून आनंद वाटला.
राजा इंद्रजीत:महाराज, आपल्या कडून ही प्रशंसा ऐकून मी कृतकृत्य झालो.
राजा जयसेन:कर्तुत्त्व असूनही अंगी नम्रता किती! राजा इंद्रजीत, म्हणून तर आमच्या प्रिय भगिनीसाठी आम्ही आपली निवड केली. आपण कृपा करून तिचा स्वीकार करावा. (दोन्ही हात जोडतो.)
राजा इंद्रजीत:(राजा जयसेनाचे दोन्ही हात हातात घेत) महाराज, हे काय! आपण आम्हाला वडील. आपली इच्छा हीच आमच्यासाठी आज्ञा. मात्र…
राजा जयसेन:(प्रश्नांकित चेहऱ्याने मंत्री वृषकेतुकडे बघतो. इंद्रजीताकडे बघत) मात्र काय, राजा इंद्रजीत. आपणास आमची विनंती मान्य नाही काय?
राजा इंद्रजीत:(हात जोडून) तसे नव्हे महाराज. विवाह हे एक पवित्र बंधन आहे! दोन कुटुंब, दोन हृदये यांचे मिलन म्हणजे विवाह. राजकन्या अवंतिका अलकापुरी राज्याची राणी होण्यास सर्वस्वी पात्र आहेत या बद्दल आमच्या मनात किंतु नाही. मात्र महाराज, राजकन्या अवंतिका यासाठी आपणहून तयार आहेत ना, इतकेच आम्हाला जाणून घ्यायचे होते.
राजा जयसेन:राजा इंद्रजीत, याबद्दल आपण निःशंक राहा. अवंतिकेला मी ओळखतो. ती माझ्या शब्दाबाहेर नाही.
राजा इंद्रजीत:महाराज, ऋणानुबंध हे आज्ञापालनाने जुळत नाहीत.
ऋणानुबंध हे हृदयी फुलती
हृदयी असता प्रीत जर,
नसे जर हा जिव्हाळा
आज्ञापालन हे केवळ।

फलित असे या नात्याचे
न लाभे कोणाला कणभर,
भासे मग जग हे मृगजळ
तृषार्त मीन, जरी सभोवती जळ।।
राजकन्या अवंतिका हिच्या मनाची तयारी नसताना मी तिचे पाणिग्रहण करू शकत नाही. (दोन्ही हात जोडून) कृपा करून मला हे करायला भरीस घालू नका.
राजा जयसेन:इतकेच ना. मग आपण स्वतः अवंतिकेला भेटून तिची मर्जी जाणून घ्या. मग तर ठीक ना? मंत्री विप्लव, राजा इंद्रजीत आणि राजकन्येच्या भेटीची व्यवस्था करा.
मंत्री विप्लव:महाराज, राजकन्या सांप्रतास वर्तल तलावाच्या शेजारील आपल्या आवडत्या कमल महालामध्ये मुक्कामी आहेत. आपली हरकत नसेल तर राजा इंद्रजीत कमल महालात त्यांची भेट घेतील.
राजा जयसेन:अवश्य, अवश्य.
(राजा इंद्रजीत आणि मंत्री विप्लव जातात.)

Leave a comment