संगीत योगायोग(अंक-3,प्रवेश-2)

(कमल महालाचे आवार. इंदुमती प्रवेश करते. मनातच तिचा विचार सुरु आहे.)
राजकन्या इंदुमती:दैव तरी किती विचित्र आहे. राजकन्या अवंतिकेला सोडवण्यासाठी आलेले मी, स्वतः इथे अडकून पडले. आणि आता तर राजा इंद्रजीत राजकन्या अवंतिकेला भेटायला आले आहेत. काय सांगू मी त्यांना? कशी सामोरे जाऊ? (हळहळते) किती हा विश्वासघात, किती मोठे हे पाप! काय करू तरी मी आता. (उदास होते.) सौमित्र दादा, शूरसेन दादा, कोणी कसे येत नाहीत अजूनही. (निश्चयाने) काहीही झाले तरी मी राजा इंद्रजीत यांच्याशी खोटे बोलणार नाही. मी त्यांच्याजवळ सत्य कथन करीन. त्याशिवाय या पापातून मुक्ती नाही. राजा जयसेन हे तर राजकन्या अवंतिकेची मर्जी न लक्षात घेता तिचा विवाह निश्चित करत होते. मात्र, राजा इंद्रजीत! त्यांनी काय अपराध केला? मी त्यांना आता, अगदी आता, खरे काय ते सांगते. कदाचित ते माझी सोडवणूक करतील. नपेक्षा फसवल्याचे पाप तरी मला लागणार नाही.
आणि जर त्यांनी मला कैद केले तर! (क्षणभर थांबते.) बंदिवासाला तर मी घाबरत नाही. मग ही व्याकुळता कुठून आली़? कदाचित… (विचार करते) कदाचित, त्या देखण्या, उमद्या तरूणाची ओढ तर नाही ना ही! कोण तो, कुठला राजकुमार आणि मी का व्याकूळ झाले? अर्ध्या घटिकेची भेट ती, आणि हे बंध इतक्या खोलवर कसे बरे रुजले?
दैवापुढे हतबल सारे, दैवगती ही असे आगळी।
दैवाने केले सावरले, दैव ते कोणा कधी न कळी।।
हाती माझ्या प्रयत्न आहे, माझ्या मनी ही सद्मति।
प्रारब्धापुढे गौण सारे तरि, प्रार्थना माझी सोबती।।
(कोणी येण्याची चाहूल लागते. स्वतःला सावरते व चेहऱ्यावर अवगुंठन घेते. राजा इंद्रजीत प्रवेश करतो. राजा इंद्रजीताला अभिवादन करते. पुढे जाऊन मान खाली घालून उभी राहते. दोघेही एकमेकांकडे पाठ करून उभे आहेत.)
राजा इंद्रजीत:(किंचित रोषाने) राजकन्या अवंतिका, इंद्रजीताचे अभिवादन स्वीकार करावे. (नमस्कार करतो.) आपले वडील बंधू महाराज जयसेन यांनी मला आपले पाणिग्रहण करण्याची विनंती केली आहे. ही विनंती मान्य करण्यापूर्वी आपले मत जाणून घ्यावे यासाठी मी आलो आहे. आपली हरकत नसल्याचे समजले तर…
राजकन्या इंदुमती:(आर्त स्वरात) महाराज!..(थबकते)
राजा इंद्रजीत:(वळतो. आश्चर्याने) राजकन्ये, इतकी व्याकुळता का आवाजात?
राजकन्या इंदुमती:प्रारब्धाने जखडलेली व्यक्ती व्याकुळ नाही होणार तर आणखी काय?
राजा इंद्रजीत:(गोंधळून) आर्ये, मला समजले नाही.
राजकन्या इंदुमती:महाराज, मी राजकन्या अवंतिका नव्हे!
राजा इंद्रजीत:(आत्यंतिक आश्चर्याने) काय! आपण राजकन्या अवंतिका नव्हेत? हे कसे शक्य आहे?
राजकन्या इंदुमती:हे खरे आहे, महाराज. राजकन्या अवंतिका आता अजेय राज्यात पोचल्या असतील.
राजा इंद्रजीत:ते कसे?
राजकन्या इंदुमती:राजकन्या अवंतिका हिचे राजा शूरसेन यांच्यावर प्रेम आहे. हा विवाह ठरवताना महाराज जयसेन यांनी तिला विश्वासात घेतले नाही. आपल्या भावाचा हट्टी स्वभाव माहित असल्याने तिने राजा शूरसेन यांना आपले हरण करण्याचे सुचवले.
राजा इंद्रजीत:मग आले का राजे शूरसेन?
राजकन्या इंदुमती:अर्थातच आले ते. राजा शूरसेन जवळच पोचले, मात्र राजा वीरभद्र यांच्या सैनिकांची एक तुकडी त्यांना आडवी आली. ते खरे तर राजा जयसेन यांच्याशी युद्ध करायला आलेले. हे समजताच राजा शूरसेन यांनी त्यांना प्रतिकार केला.
राजा इंद्रजीत:पुढे काय झाले?
राजकन्या इंदुमती:शत्रूचे बळ लक्षात घेता असे ठरले की बहूत सैनिकांसमवेत राजा शूरसेन शत्रूला तोंड देतील. काही सैनिक जाऊन त्रिवर्णाचे सेनापती यांना निरोप देतील.
राजा इंद्रजीत:हे सर्व तुम्हाला कसे माहित?
राजकन्या इंदुमती:महाराज, मी देखील त्यांच्या सोबत होते. मी पुढे येऊन राजकन्या अवंतिकेला बरोबर घेऊन परत जाणार होते.
राजा इंद्रजीत:फारच धाडसी बेत होता. आणि तुम्ही त्यांत सामिल होता म्हटल्यावर तुम्ही देखील फार धाडसी दिसता.
राजकन्या इंदुमती:महाराज, (दुःख स्वरांत) तुम्ही माझी थट्टा करताय का?
राजा इंद्रजीत:नाही, नाही. काही दिवसांपूर्वी तुमच्यासारख्या एका धाडसी तरूणीने एका बाणात वाघाला ठार करून आम्हाला वाचवले होते. तुमच्यामुळे आम्हाला तिची आठवण झाली.
राजकन्या इंदुमती:(आनंदाश्चर्याने) निःशस्त्र असताना आपणच वाघाशी झुंज देत होता तर!
(इंदुमती आपले अवगुंठन उचलते आणि वळते. राजा इंद्रजीत आणि इंदुमती दोघेही एकमेकांकडे बघतात. दोघे काही क्षण बघतच राहतात. नजरानजर होताच दोघेही सुखावतात. आता दोघांच्या मनावरील दडपण दूर झाले आहे आणि दोघांचे चेहरे प्रफुल्लीत झाले आहेत.)
इंदुमती, राजा इंद्रजीततुम्ही! (दोघे थांबतात.)
इंदुमती, राजा इंद्रजीतइथे असे? (दोघे थांबतात.)
इंदुमती, राजा इंद्रजीततुम्ही बोलावे. (काही क्षणांनी)
राजा इंद्रजीत:मनाने मनाला साद घालावी आणि त्याचे उत्तरही मनोमनी मिळावे, काय हा दुर्लभ योगायोग.
राजकन्या इंदुमती:काही म्हणालात का?
राजा इंद्रजीत:परिचय नाही देणार तुमचा?
राजकन्या इंदुमती:(लाजते) मी राजकन्या इंदुमती. सुमित्र देशाचे राजे सौमित्र यांची धाकटी भगिनी.
राजा इंद्रजीत:त्यादिवशी तुम्ही माझे प्राण वाचवले. तुमच्या धाडसाने मी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. बरेचदा तुमचा विचार मनात यायचा. (थोडे थांबून) पुन्ही कधी भेट होईल की नाही, असाही विचार मनात यायचा.
राजकन्या इंदुमती:(इंद्रजीताचे बोलणे ऐकून संकोचते.) मी देखील आपली आठवण काढत होते. परंतु गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडल्या, त्यामध्ये फारच गुंतायला झाले होते.
राजा इंद्रजीत:हो की! तुम्ही इथे अडकला हे समजले, पण मग राजा शूरसेन आणि तुमच्यावर हल्ला करणारे, काय झाले त्यांचे?
राजकन्या इंदुमती:ते कळायला काही मार्ग नाही. मी राजकन्या अवंतिकेला घ्यायला आले आणि आम्ही दोघी निघणार इतक्यात वर्दी आली की तुम्ही भेटायला येत आहात. आम्ही दोघी गेलो असतो तर बिंग लगेच फुटले असते. म्हणून मग पोषाख बदलून मी राजकन्या अवंतिका म्हणून तुम्हाला भेटायला आले. राजकन्या अवंतिका आता राजा शूरसेन यांच्याकडे पोचली असेल.
राजा इंद्रजीत:म्हणजे राजकन्या अवंतिका आपल्या इच्छित वराकडे पोचल्या म्हणायचे. (किंचित हसत) जे झाले ते खरे तर बरेच झाले. मात्र हे आता राजा जयसेन यांच्या कानी कोण घालणार?
राजकन्या इंदुमती:(काळजीयुक्त स्वरात) हो ना. महाराज जयसेन शिघ्रकोपी आणि हट्टी आहेत असे मी ऐकले आहे. मला यातून एकच मार्ग दिसतोय. तो म्हणजे, हे नाटक आपण दोघांनी असेच सुरु ठेवावे आणि योग्य समयी मी इथून निघून जावे.
राजा इंद्रजीत:नाटक सुरु ठेवायला तर माझी मुळीच हरकत नाही. मात्र तुम्ही इथून जाल कशा? मी तर इथला पाहुणा आहे, त्यामुळे मला काहीच धोका नाही. तुम्ही पकडलं जाणं काही ठीक नाही.
राजकन्या इंदुमती:होय, त्याचाही विचार करायला हवा. आणि समजा, जर मला जाता आले नाही तर? (थोडी घाबरून) दादा सौमित्र आणि राजा शूरसेन मला सोडवायला येतील, पण…
राजा इंद्रजीत:पण यामुळे गैरसमज होऊन वैर मात्र होऊ शकतं, असेच ना?
राजकन्या इंदुमती:होय. (विचारात पडते.) मग करावे तरी काय?
राजा इंद्रजीत:तुम्ही म्हणता, की हे नाटक आपण असेच सुरु ठेवावे. तर मग जायचे का आहे तुम्हाला?
राजकन्या इंदुमती:(गोंधळून) मला समजले नाही.
राजा इंद्रजीत:म्हणजे आपण हे नाटक असेच सुरु ठेवले तर या नाटकाच्या अंती आपला विवाह होईल. तुमची हरकत नसेल तर …
राजकन्या इंदुमती:(अविश्वासाने) म्हणजे आपला विवाह होणे तुम्हाला मान्य आहे?
राजा इंद्रजीत:(जवळ जात) होय इंदुमती. आपल्या पहिल्या भेटीनंतर मी तुला शोधण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र सर्व व्यर्थ ठरले. मी आशा सोडली नव्हती, मात्र मनाने निराशच होतो. आणि आता तूच माझ्या समोर येऊन ठाकलीस हे नशीबच माझं. (इंदुमतीचे हात हाती घेत) प्रारब्ध नेहमीच आपल्याला जखडून टाकते, मात्र हा बंदीवास फारच सुखावह वाटतोय मला.
राजकन्या इंदुमती:(लाजून आरक्त होते) नक्कीच सुखावह आहे.
राजा इंद्रजीत:वीरांगना, तू मोहिनी,
मम हृदय स्वामिनी।
साहसवीरा, तू शौर्या,
भावे मज तू भामिनी।

भेट ती होता, मन मोहित झाले,
तव शौर्य-करुणा ज्ञात झाले।
आधी एकदा मुकलो मी तुजला,
आता तू मम प्रेम बंदिनी।।
राजकन्या इंदुमती:बंदीवास हा भावे मजला,
न आता अंतर यावे कधीही।
मिठीत तुझ्या या सदैव राहो,
ही तुझी प्रेम बंदिनी।।
राजा इंद्रजीत:मग आता एक काम करुया. तू राजकन्या अवंतिका म्हणूनच वावर आणि मी येथून निघालो की तातडीने एक स्वार राजा शूरसेन यांच्याकडे धाडीन आणि त्यांना तुझे क्षेम कळवीन.
राजकन्या इंदुमती:होय, हे ठीक राहील.
(कोणीतरी येण्याची चाहूल लागते.)
राजकन्या इंदुमती:मी निघते.
राजा इंद्रजीत:होय, निघ तू.
(इंदुमती जाते, मंत्री वृषकेतु प्रवेश करतो. इंद्रजीत इंदुमती जाण्याच्या दिशेला बघत आहे.)
मंत्री वृषकेतु:महाराज, महाराज..
राजा इंद्रजीत:(भानावर येत, स्वतःशीच हसतो.) काय म्हणताय मंत्री वृषकेतु?
मंत्री वृषकेतु:महाराज, आपण फारच आनंदी दिसताय. काही विषेश कारण?
राजा इंद्रजीत:वृषकेतु, अरे जिच्या दर्शनासाठी मी इतकी तपःश्चर्या केली आज तीच माझ्यासमोर अवतरली.
मंत्री वृषकेतु:मी समजलो नाही, महाराज.
राजा इंद्रजीत:वृषकेतु, अरे मी इंदुमतीला भेटलो.
मंत्री वृषकेतु:इंदुमती, कोण या?
राजा इंद्रजीत:अरे ही तीच जिच्या एका बाणाने त्या आक्रमक वाघाचा प्राण घेतला.
मंत्री वृषकेतु:म्हणजे आपले प्राण ज्यांनी वाचवले त्या.
राजा इंद्रजीत:होय, होय. तीच.
मंत्री वृषकेतु:पण महाराज, आपण तर राजकन्या अवंतिकेला भेटायला आला होता ना?
राजा इंद्रजीत:अरे होय, तुला सांगायचे राहिले. अरे, राजा शूरसेनाने राजकन्या अवंतिकेचे हरण केले आहे. आणि तिच्या जागी इंदुमती आली आहे. इंदुमती ही राजा सौमित्राची धाकटी भगिनी. आता तू एक काम कर, योग्य संधी साधून, सत्वर जा आणि राजा शूरसेनाला इंदुमतीचे कुशल कळव. त्याला घडलेले सर्व काही सांग.
मंत्री वृषकेतु:जशी आज्ञा, महाराज.
(दोघेही जातात.)

Leave a comment