संगीत योगायोग (अंक-2, प्रवेश-6)

(राजा इंद्रजीताचे दालन. विचारमग्न अवस्थेत राजा इंद्रजीत आपल्या आसनावर बसलेला आहे. मंत्री वृषकेतु प्रवेश करतो.)
मंत्री वृषकेतु:महाराजांचा विजय असो! (राजा इंद्रजीताचे लक्ष नाही हे लक्षात येऊन..) महाराज!
राजा इंद्रजीत:(भानावर येत). मंत्री वृषकेतु, मंत्री विप्लव यांची भेट आम्हाला पेचात टाकून गेलीये. तुम्ही म्हटल्या प्रमाणे प्रसंग खरोखर कठीण होता. तुमच्या प्रसंगावधानामुळे आम्ही वाचलो.
मंत्री वृषकेतु:महाराज, आपला काय विचार झालाय? आठवडा होऊन गेलाय. राजे जयसेन यांना काही ना काही उत्तर देणे आवश्यक आहे.
राजा इंद्रजीत:होय. उत्तर तर देणे आवश्यक आहेच. तुमचे काय म्हणणे आहे?
मंत्री वृषकेतु:महाराज, मित्र राज्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी दोहोंमध्ये नातेसंबंध निर्माण करणे ही पूर्वापार परंपरा आहे. यासाठी विवाह प्रस्ताव मांडले व स्वीकारले जातात. त्यात गैर असे काही नाही. राजा जयसेन यांनी स्वतःहून हा प्रस्ताव मांडला हेही विशेष. या वरून हे नक्की सुचित होते की तुम्ही त्यांच्या विश्वासास पात्र आहात. पराक्रम, राज्यकराभार, शासन, न्याय-निवाडा या सर्व निकषांवर तुम्ही स्वतःला सिद्ध केले आहे. याचा अर्थ असाही आहे की त्यांनी तुमच्याबद्दल खडा न् खडा माहिती मिळवली आहे.
राजा इंद्रजीत:हा प्रस्ताव कशाच्या जोरावर स्वीकारायचा हेच समजत नाही.
मंत्री वृषकेतु:महाराज, त्रिवर्ण राज्य बलाढ्य आहे. स्वतः राजे जयसेन अत्यंत कर्तुत्त्ववान आहेत. शिवाय, त्रिर्वण राज्यासोबत मैत्र निर्माण झाल्यास राजा वीरभद्र पुन्हा आपल्या वाटेला जाणार नाही. पुन्हा युद्ध झाले तरीही आपल्याला महाराज जयसेन यांचा पाठींबा असेल. दक्षिणेकडील शत्रूला त्रिवर्ण राज्याच्या सीमेवर गाठून नमवणेही आपल्याला सोपे होईल.
राजा इंद्रजीत:(नाखुषीने) युद्धातील फायदा इतकाच हेतू असावा का? यामध्ये आमच्या आवडीचा काही विचारच नाही.
मंत्री वृषकेतु:(काळजीच्या स्वरात) महाराज, हा प्रस्ताव स्वीकारून जेवढा त्रास होईल, त्यापेक्षाही जास्त त्रास तो नाकारून होईल. राजे जयसेन हे अतिशय हट्टी आहेत. त्यांच्या निर्णयाविरुद्ध कोणी जाण्याचा विचारही करू नये. त्रिवर्णाच्या बलाढ्य सत्तेचा रोष ओढावून घेण्यासारखे आहे हे.
राजा इंद्रजीत:वृषकेतु, अरे काल पर्यंत अनोळखी असणाऱ्या स्त्रीला आपली पत्नी म्हणून स्वीकारायचे कसे?
मंत्री वृषकेतु:महाराज, आपण ज्या आर्येचा विचार करताय, तिला आपण ओळखता का? ओळख सोडा, ती आपल्याला पुन्हा भेटेल याची काही शक्यता आहे का? आता प्रर्यंत तुम्ही कमी का गुप्तचर धाडले या कामी? मात्र कोणीही काहीही माहिती काढू शकलं नाही. महाराज, तुमच्याशी विवाह करणारी स्त्री केवळ तुमची पत्नी नाही तर या संपूर्ण राज्याची राज्ञी होणार आहे. ही निवड विचारपूर्वक होणे आवश्यक आहे.
राजा इंद्रजीत:मंत्री वृषकेतु, त्या आर्येला बघून माझ्या मनात जे विचार आले ते मी कथन करतो.
भार्या न ती केवळ माझी, माता ती मज रयतेची।
सुख दुःख ती जाणून घेई, घाली फुंकर प्रेमाची।।
अर्धांगिनी न ती केवळ कर्तव्यासी, अधिकारी ती मम सम राज्याची।
लढेल ती रणांगणी कधी, कधी बसवेल घडी ती राज्याची ।।
(अभिमानाने) मंत्री वृषकेतु, आमच्या निवडीबद्दल आमच्या मनात कोणताही किंतु नाही. (उसासा टाकून) मात्र, आमच्या राज्यावर आमच्यामुळे संकट यावे हे उचित नाही. तुम्ही आजच स्वार रवाना करून त्रिवर्णात संदेश पाठवा. आम्ही लवकरच राजा जयसेन यांच्या भेटीला जाऊ.
मंत्री वृषकेतु:(समाधानाने) महाराजांचा विजय असो! मी लगेच कामाला लागतो.
(मंत्री वृषकेतु जातो.)
राजा इंद्रजीत:(दुःखी स्वरात) हे आर्ये, मला एकदा भेटण्याची कृपा कर !

Leave a comment