
| ( राजा इंद्रजीताचे दालन. राजा इंद्रजीत विचारमग्न आहे. मंत्री वृषकेतु प्रवेश करतो.) | |
| मंत्री वृषकेतु: | महाराजांचा विजय असो. |
| राजा इंद्रजीत: | (भानावर येत) बोला मंत्री. |
| मंत्री वृषकेतु: | महाराज, राजा वीरभद्र यांनी आपल्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. हे युद्ध त्यांना फारच महागात पडले असे दिसतेय. |
| राजा इंद्रजीत: | (सावध होत) असे म्हणण्याचे काय कारण? |
| मंत्री वृषकेतु: | महाराज, राजा वीरभद्र आणि महाराज जयसेन हे पिढीजात शत्रू. या दोघांची ही तिसरी पिढी आहे जे हे शतृत्त्व वारसाहक्काने मिळालेल्या एखाद्या जाहागिरीसारखे पोसत होते. महाराज जयसेन शब्दाला महत्त्व देतात म्हणून आणि राजा वीरभद्र विरोधाला विरोध करायचा म्हणून हे शतृत्त्व याही पिढीत टिकले. |
| राजा इंद्रजीत: | म्हणून त्रिवर्ण राज्यावर हल्ला करण्यासाठी आमची काहीही मदत मिळणार नाही आणि त्यासाठी कणव राज्याची तसूभरही भूमि वापरता येणार नाही ही अट त्यांना इतके दिवस मान्य होत नव्हती. |
| मंत्री वृषकेतु: | होय, असेच. खरे तर तुम्हाला युद्धाचे आवाहन देऊन हरवायचे आणि त्याबदल्यात त्रिवर्णावर हल्ला करण्यासाठी मदत आणि भूमि मागायची हाच डाव होता, असे त्यांनी शेवटी मान्य केलेच की. |
| राजा इंद्रजीत: | मग तर जे झाले ते ठीकच झाले, असे मानायला हवे. |
| मंत्री वृषकेतु: | महाराज, आपण जी तहाची कलमं राजा वीरभद्र यांचेकडून कबूल करुन घेतली, त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात तरी काही अडचण येणार नाही, असे वाटतेय. या बद्दल आपले अभिनंदन. |
| राजा इंद्रजीत: | अभिनंदन तर त्या वीर योद्ध्यांचे करावे, ज्यांच्यामुळे आपल्याला हा विजय मिळाला. |
| धीर वीर, कणव जन हे। पालनकर्ता मानुन मज ते। प्राण पणाला लावुन लढले। माणिक हे मम राज्याचे।। अलंकार बहू देऊन त्यांना। सन्माने बोलावून आता। ऋण फेडाया तत्पर आहे। हा नृप कणवाचा ।। | |
| मंत्री त्यांची योग्य अशी कदर केली जावी. त्यांच्या शौर्याबद्दल, त्यागाबद्दल आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू. | |
| मंत्री वृषकेतु: | जशी आज्ञा, महाराज. (थोडे रेंगाळतात) |
| राजा इंद्रजीत: | अजून काही बोलायचे आहे? |
| मंत्री वृषकेतु: | होय महाराज, थोडे खासगी बोलायचे होते. |
| राजा इंद्रजीत: | राजाला आणि राजाचे – खासगी असे काही असते का? बोला, निःसंकोचपणे बोला मंत्री. |
| मंत्री वृषकेतु: | महाराज, आपण वर्णिकेच्या प्रदेशातून जेव्हापासून आलात तेव्हापासून जरा अलिप्त, विचारमग्न राहाताय असे भासतेय. आपली जखमही भरत आली आहे. मात्र मनात काही राहिले असे वाटते. काही विवंचना छळतेय का आपल्याला? |
| राजा इंद्रजीत: | (उसासा टाकत) वर्णिकेच्या प्रदेशात आमच्यावर वाघाने हल्ला केला होता तेव्हा एका तरूणीने एका बाणात त्याला टिपले होते. त्या आर्येने आमच्या ह्रदयाचा ठाव घेतला आहे. तिचे शौर्य, तिचे मार्दव, तिचे ते मंजूळ बोल, विनम्र भाव…. मोहिनी घातली आहे तिने आमच्यावर. सतत तिचेच विचार मनात येतात. |
| मंत्री वृषकेतु: | महाराज, कोण ती, कुठली स्त्री. एका राज्याच्या राजाने एका सामान्य तरूणीसाठी इतके अस्वस्थ ह्वावे हे बरोबर नाही. |
| राजा इंद्रजीत: | एका बाणात वाघाला टिपणारी व्यक्ती सामान्य कशी असू शकेल मंत्री वृषकेतु? |
| मंत्री वृषकेतु: | महाराज, एका बाणात वाघाला टिपणारे कमी धनुर्धर आहेत का आपल्या राज्यात? आपण स्वतः सुद्धा हे साहस… |
| राजा इंद्रजीत: | मंत्री, ती एक स्त्री होती! (मंत्री वृषकेतु अस्वस्थ होतात) तिच्या हालचालींवरून ती निष्णात योद्धा वाटत होती. तिची बोली राजबोली होती. तिच्यामध्ये जणू धैर्य, धृती आणि विवेकाची गुंफण होती. |
| मंत्री वृषकेतु: | ती कोण आहे, हे देखिल तुम्हाला माहित नाही, महाराज. |
| राजा इंद्रजीत: | वृषकेतु, मला खरोखर कल्पना नाही. म्हणूनच ती मला एकदा तरी भेटणे महत्त्वाचे आहे. |
| मंत्री वृषकेतु: | महाराज, राजमुकुट धारण करणाऱ्यासाठी प्रजेच्या हिताशिवाय आणि आपल्या राज्याच्या सीमांच्या रक्षणाशिवाय इतर कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसते. |
| राजा इंद्रजीत: | वृषकेतु! (उसासा टाकत) फारच काटेरी आहे हा मुकुट! |
| मंत्री वृषकेतु: | महाराज, असे विचार तुम्ही मनातून काढून टाकायला हवे. तुम्ही अजून पहिलेच युद्ध लढला आहात. अजून अनेक लढाया लढायच्या आहेत. कठीण प्रसंग तर अजून यायचा आहे. |
| राजा इंद्रजीत: | म्हणजे, मी समजलो नाही. |
| मंत्री वृषकेतु: | महाराज जयसेन यांचे मंत्री विप्लव, आपल्याला भेटण्यासाठी जातीनिशी येत आहेत, हा संदेश त्यांचा स्वार घेऊन आलाय. |
| राजा इंद्रजीत: | कोणतीही पूर्वकल्पना न देता भेटीला आले! काय म्हणणे असेल त्यांचे? |
| मंत्री वृषकेतु: | खरे तर काही स्पष्ट कारण दिसत नाहीये. खाजगीत बोलायचे म्हणताय. राजा वीरभद्र त्यांचे पिढीजात शत्रू. आपण त्यांचा पराभव केला. ही भेट त्या संदर्भात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. |
| राजा इंद्रजीत: | त्यांचे यथोचित स्वागत करून त्यांना आमच्या भेटीला घेऊन या. |
| मंत्री वृषकेतु: | जशी आज्ञा, महाराज. |
| (मंत्री वृषकेतु , मंत्री विप्लव यांना घेऊन येतात.) | |
| मंत्री विप्लव: | महाराज, राजे जयसेन यांचे वतीने मी मंत्री वप्लव आपल्याला भेटायला आलोय. |
| राजा इंद्रजीत: | आपल्याला भेटून आम्हाला आनंद झाला. महाराज जयसेन यांनी तुम्हाला विनाकारण तसदी दिली. आम्हाला निरोप मिळाला असता तर आम्ही स्वतःच आलो असतो महाराजांच्या भेटीला. |
| मंत्री विप्लव: | आपण नुकतेच युद्धाहून परतला आहात. आपला पराक्रम ऐकून महाराजांना संतोष झालाय. मात्र ज्या कारणासाठी भेटायचे आहे, त्यासाठी तुम्हाला त्रास देणे ठीक नाही. |
| राजा इंद्रजीत: | म्हणजे, मी समजलो नाही. |
| मंत्री विप्लव: | महाराज जयसेन यांनी आपल्या धाकट्या भगिनीचे, राजकन्या अवंतिका हिचे पाणिग्रहण करण्याची आपल्याला विनंती केली आहे. |
| राजा इंद्रजीत: | अचानक! कसे? |
| मंत्री विप्लव: | अचानक नव्हे, महाराज. राजे जयसेन यांचा हा अनेक दिवसांचा मानस आहे. आपल्या भगिनीसाठी त्यांना आपण सर्वस्वी योग्य वर वाटता. आपली हरकत नसेल तर हे शुभ कार्य लवकरात लवकर संपन्न व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. |
| (अचानक आलेल्या या प्रस्तावामुळे राजा इंद्रजीत गोंधळून गेलेत. ते स्तब्ध उभे आहेत. दोन्ही मंत्री एकमेकांकडे बघतात.) | |
| मंत्री विप्लव: | महाराज, या शांततेचा अर्थ काय? |
| मंत्री वृषकेतु: | (राजा इंद्रजीत यांना शांत बघून) मंत्री विप्लव, राजे जयसेन यांची इच्छा जाणून महाराज विचारमग्न झाले आहेत. कदाचित आपण नविनच राजगादीवर विराजमान झाल्याने हा मान आपल्याला मिळाणे योग्य आहे वा नाही, या संभ्रमात ते असावेत. त्यांच्या मनाची अनिश्चितता दूर करण्यासाठी थोडा अवधी मिळाल्यास उत्तम राहील. महाराज नुकतेच राजा वीरभद्र यांच्यावर विजय मिळवून परतले आहेत. तहाच्या अंमलबजावणीसाठी ते काही काळ तरी व्यस्त राहण्याची शक्यता आहे. आपण निश्चिंत मनाने परतावे. राजे इंद्रजीत स्वतः महाराज जयसेन यांच्या भेटीला येतील. |
| मंत्री विप्लव: | ठीक आहे. |
| राजा इंद्रजीत: | (सावरून) मंत्री विप्लव, महाराज जयसेन यांना आमचा प्रणाम सांगा. मंत्री वृषकेतु यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील काही दिवस तरी आम्हाला राज्यकारभारातून सवड काढता येणे कठीण दिसतेय. आपली हरकत नसेल तर इथली कार्ये मार्गी लागताच आम्ही महाराजांच्या भेटीला जातीने येऊ. मात्र, महाराजांचा आदेशच असेल तर आम्ही…. |
| मंत्री विप्लव: | महाराज, आपल्या आश्वासनामुळे मी संतुष्ट झालो. आम्ही आपल्या येण्याची वाट बघू. ही भेट लवकरच घडावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. |
| राजा इंद्रजीत: | अवश्य. मंत्री वृषकेतु, मंत्री विप्लव यांना आदराने निरोप द्या. |
| मंत्री वृषकेतु: | जशी आज्ञा, महाराज. |
| (मंत्री विप्लव व मंत्री वृषकेतु दोघेही जातात.) |
Leave a comment