
| (वर्णिका नदीचा रम्य परिसर. सांज वेळ. इंदुमती सावध प्रवेश करते. तिच्या खांद्यावर धनुष्य आणि पाठीवर भाता आहे. तिचा चेहरा झाकलेला आहे.) | |
| राजकन्या इंदुमती: | (आजुबाजुला कानोसा घेत पुढे येते. धोका नाही हे जाणवून निवांत होते. आपल्या चेहऱ्यावरील पडदा दूर करते. आजुबाजुला बघत दीर्घ श्वास घेते.) किती रम्य हा परिसर. निवांत वेळ घालवावा, असा हा प्रदेश. ही वनराजी, हा नदीचा प्रवाह. सगळे किती आल्हाददायक आहे. आज राजा शूरसेन यांचा निरोप जर तातडीने राजकन्या अवंतिकेला द्यायचा नसता, तर किती तरी वेळ या अष्टमीच्या चंद्राकडे बघत बसले असते. त्याचे हे शीतल चांदणे अंगावर घेतले असते. या महत्त्वाच्या कामगिरीवर असता, हे विचार ही मनात येणे नको. आता पर्यंत तरी कोणी बघितले नाही, असे वाटते. (पलिकडे बघत) ती तिकडे आहे वाटते राजकन्या अवंतिकेची निवासाची व्यवस्था. जरा वेळाने ती नदी किनारी, भेटीच्या नेमक्या ठिकाणी येईल. नदी पार करण्याकरिता ही वेळ ठीक नाही. आता सांजवेळ आहे. पूर्ण काळोख होई पर्यंत थांबणे इष्ट राहील. मी इथेच आडोश्याला विश्रांती घेते, म्हणजे कोणाला दिसणार नाही. |
| (आडोशाला जाते व थांबते. जरा वेळाने वाघाच्या डरकाळीचा आवाज येतो. इंदुमती सावध होते, आपला चेहरा झाकून घेते व बाण प्रत्यंचावर चढवते. सावध पवित्रा घेऊन आवाजाच्या दिशेने पुढे सरकते. थोडी पुढे गेल्यावर तिचा बाण सुटतो आणि वाघाची डरकाळी एेकू येते. पाठोपाठ वाघ खाली पडण्याचा प्रचंड आवाज होतो. राजा इंद्रजीत हात शेल्यात गुंडाळून प्रवेश करतो. त्याला होणाऱ्या वेदना जरी चेहऱ्यावर दिसत असल्या तरीही तो शांत असतो. धनुष्य बाजूला ठेवून इंदुमती राजा इंद्रजीताकडे धावते. | |
| राजकन्या इंदुमती: | (जखम बघत) जखम फार खोल नाहिये, मात्र स्वच्छ करायला हवी. मी नदीचे थोडे पाणी आणते. (पानाचा द्रोण करून इंदुमती थोडे पाणी आणते. जखमेवर टाकते. झाडांमध्ये गायब होऊन थोडी पाने आणते. व त्याचा रस जखमेवर टाकते. इंद्रजीताला झोंबते. तो कळवळतो. इंदुमती त्याला थोडे पाणी पाजते. ) |
| राजकन्या इंदुमती: | (जखमेकडे बघत, थोडे आश्चर्याने) आपण वाघाशी झुंजत होता काय? |
| राजा इंद्रजीत: | (तिच्याकडे बघत) होय, असं का विचारलं? |
| राजकन्या इंदुमती: | आणि तुमचे शस्त्र? |
| राजा इंद्रजीत: | नाही, आज मी निःशस्त्र होतो. खरं तर माझा परतीचा प्रवास सुरु आहे. इथे मी यायला नको होते. राजा जयसेन यांचे निशाण लावले आहे, तरीही या रम्य जागेचा मोह आवरणे कठीण गेले आणि इथे एका रात्रीचा मुक्काम पडला. मला कल्पना नव्हती की या परिसरात हिंस्त्र प्राणी आहेत ते. नाही तर मी असा निःशस्त्र नसतो पडलो बाहेर. |
| राजकन्या इंदुमती: | थोडक्यात निभावले म्हणून ठीक आहे. पुढचे वेळी काळजी घ्या. मी माझी ओढणी गुंडाळते, मात्र राजवैद्यांकडून औषधी लेप लगेच लावून घ्या. |
| (असे म्हणत असताना तिच्या चेहऱ्यावरचे अवगुंठन खाली येते. जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या इंदुमतीकडे बघण्यात राजा इंद्रजीत गुंग होतो. तितक्यात पावलांचा व बोलण्याचा आवाज येतो.) | |
| राजकन्या इंदुमती: | बापरे! कोणी तरी येतंय वाटतं इकडे. मी निघते. |
| राजा इंद्रजीत: | आर्ये, तुझे नाव तर सांगून जा. कोण तू? कुठली? काही तर बोल. |
| (इंदुमती बावरते. आपले धनुष्य हाती घेते. आपली ओळख द्यावी की नाही या संभ्रमात ती असताना, पुन्हा आवाज येतो. आवाज आता मोठा झालेला होता. त्यामुळे इंदुमती निघून जाते. इंद्रजीत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला ते जमत नाही. तिच्या जाण्याच्या वाटेकडे तो बघत राहतो.) | |
| सुलक्षणे , तू कोण अपरिचित, भेट ही घडली, ती ही अवचित। तुज पाहता मम भान नुरावे, आकृष्ट मन तुज हे झाले।। प्रियंवदे तू, बोलुन मजसी, जिंकून घेसी माझी मर्जी। ओठातून परि शब्द ना वाहे, न खंडे मर्यादा तसुशी।। | |
| (मंत्री वृषकेतु व सैनिक प्रवेश करतात.) | |
| मंत्री वृषकेतु: | महाराज, आपण ठीक तर आहात ना? |
| राजा इंद्रजीत: | (स्वतःच्याच तंद्रीत) हो, तर. |
| मंत्री वृषकेतु: | ठीक आहात? महाराज, आम्ही वाघाची डरकाळी ऐकली? |
| राजा इंद्रजीत: | (अजूनही इंदुमतीच्या जाण्याच्या वाटेकडे बघत) हो. होता एक वाघ इथे. मारलं त्याला. |
| मंत्री वृषकेतु: | कोणी मारलं? |
| राजा इंद्रजीत: | (भानावर येत) कोणी मारलं, मला ठाऊक नाही. |
| मंत्री वृषकेतु: | ठाऊक नाही? महाराज आपण शुद्धीवर आहात ना? |
| राजा इंद्रजीत: | होय तर. |
| मंत्री वृषकेतु: | (सैनिकाला) जा, वैद्यांना बोलावणे पाठव. (दुसऱ्या सैनिकाला) तू जाऊन बघ जरा झाडीत, कोणी लपलं आहे का ते? (इंद्रजीताकडे बघत) महाराज, आपण आधी आपल्या निवासात परतू. |
| राजा इंद्रजीत: | होय. |
| (मंत्री वृषकेतु व राजा इंद्रजीत निघून जातात.) |
Leave a comment