
| (राजकन्या अवंतिका नदीकिनारी वाट बघत बसली आहे.) | |
| राजकन्या अवंतिका: | नाथ, आजही येतील असे दिसत नाही. रात्रीचा तिसरा प्रहरही संपत आला असावा. अष्टमी पासून वाट बघतेय मी त्यांची. परंतु आज अगदी कहर झाला. इतक्या भेटी झाल्यात, मात्र कधीच मला इतकी वाट बघावी लागली नव्हती. गेला मासही असाच वाट बघण्यात गेला. आता हा देखिल. सोनचाफ्याचा तो सुगंध कधी येतो अशी उत्सुकता असते दरवेळी. आज मात्र काही वेगळेच वाटतेय. का कोण जाणे काही अरिष्ट तर आले नसावे? नको नको ते विचार येत राहतात मनात. या अस्वस्थ मनाला विसावा तरी कसा मिळावा? शूरसेनाशिवाय ही अवंतिका जगणार तरी कशी? |
| (शूरसेनाला उद्देशून) चंद्र जसा नियमित रजनीला भेटायला येतो, तसाच तू आजवर आला आहेस. आज मात्र तू आला नाहीस. या चंद्रालाच मी तुला निरोप सांगायला सांगतेय, तू मला नश्चित व सत्वर भेट. हा विरह मला व्याकूळ करतोय आणि अधिक सहन करणे माझ्या अगदी जीवावर आले आहे. मला तर ही पौर्णिमेची रात्र सुद्धा अमावस्या वाटत आहे. | |
| ( दुःखी होते.) | |
| अरे चंद्रा, तू तर बघत असशील ना त्यांना? जाऊन जरा क्षेम विचारून ये नाथांना. आणि तुला शपथ आहे, तू जर निरोप आणला नाहीस तर तू लहान होत होत आटून जाशील आणि या अंधारात विलिन होशील. | |
| विरहीणी मी, तुझी प्रिया, शपथ घालते निशीकांता, जा रे जा तू त्वरित आता, क्षेम घेऊनी ये सत्वरा ।। जैसा येई रजनीकांत, भेटीला या रजनीच्या। येतसे तू मज भेटावया, अष्टमीला शुक्लाच्या। मग सांग हे कैसे अतर्क झाले, दोनी मास तुझे दर्शन ना व्हावे। व्याकूळ करि हा विरह आता, नाही सोसवे मजला हा आता। पूनम का ही, अवसच भासे, मज हृदयी तव प्रीत विराजे। शपथ तुला हे रजनीकांता, निरोप हा तो वेगी आणा। कर्तव्यपूर्ति तू न करिता, कोपित प्रीत ही शापिल तुजला। आटत आटत विरून जाशील, एकरूप होशील या अंधारा। जा रे जा तू त्वरित आता, क्षेम घेऊनी ये सत्वरा।। | |
| (गाणे गात, वाट बघत झोपी जाते.) | |
Leave a comment