
| (वर्णिका नदीचा परिसर. राजकन्या अवंतिका अधीर होऊन कोणाची तरी वाट बघतेय. तेवढ्यात तिच्या पायाशी सोनचाफ्याचे फूल येऊन पडते. राजकन्या अवंतिका ते सोनचाफ्याचे फूल उचलते. आनंदीत होऊन गाते..) | |
| राजकन्या अवंतिका: | सोनचाफा घेऊनी आला, संकेत आगमनाचा, सुगंध लपेटून आला त्याला, माझ्या प्रियाचा, तव आगमने मी प्रफुल्लित झाले, सहस्र कमळे सहज फुलावे, सुवास तो हा दाटून राहे, आसमंती प्रितीचा॥ |
| (शूरसेन येऊन तिला गाण्यात साथ देतो…) | |
| राजा शूरसेन: | कमलमुख मी हे पाहता, पुनमरात्री आभास हा होता, एका निशी या दर्शन व्हावे, दोन चंद्रमा नभी-स्थली यावे, प्रकाश हा तो व्यापून टाके, आसमंत प्रितीचा॥ |
| (दोघेही हातात हात घेऊन नदी किनारी येऊन बसतात.) | |
| राजकन्या अवंतिका: | नाथ, या सोनचाफ्याच्या सुगंधाने मला हटकून आपल्या पहिल्या भेटीची आठवण होते. |
| राजा शूरसेन: | हो ना! या फूलाच्या रूपानेच मी तुला पहिला प्रिती-संदेश पाठवला होता. |
| राजकन्या अवंतिका: | अगदी पहिल्यांदाच मी या रम्य परिसरात आले होते. आईने तेव्हा सांगितले होते, ‘वर्णिका देवीच्या मंदिरात मनापासून जे मागशील, ते नक्की मिळेल.’ मी नुकतेच मंदिरातून परतले होते. तेव्हा आपल्याला शूर पती मिळावा, असे मी मनोमन म्हटले होते. त्याच वेळी आपली भेट झाली होती. |
| राजा शूरसेन: | होय, मला आठवतंय. मी देखील पहिल्यांदाच या परिसरात आलो होतो. तेव्हा इथले विहाराचे नियम मला ठाऊक नव्हते. राजा जयसेनाचे निशाण असूनही मी या परिसरात आलो होतो. आणि मी तेव्हा तुला इथेच पहिल्यांदा पाहिले होते. |
| राजकन्या अवंतिका: | होय. स्वतःची ओळख करून देण्याची आणि अभिवादनाची रीतही खास होती तुमची. बाणाला सोनचाफ्याची माला अडकवून माझ्या पायाशी बाण मारला होता तुम्ही. |
| राजा शूरसेन: | (मधूर आठवणींनी फुलतो व हसतो.) |
| राजकन्या अवंतिका: | त्या नंतर आपल्या अनेक भेटी झाल्या. प्रत्येक वेळी नवीन रीत. ती ही खास. |
| (या स्तुतीने शूरसेनाचे हृदय उचंबळून येते. ) | |
| राजकन्या अवंतिका: | (शूरसेनाकडे बघत) इतक्या भेटी झाल्या. आपण कधीही विलंब केला नाही. शुक्ल पक्षाच्या अष्टमीला आपण इतके मास नियमितपणे भेटत आलो. मग आजच का उशीर? |
| राजा शूरसेन: | (वरमतो.) |
| राजकन्या अवंतिका: | नाथ, किती हो वाट बघायला लावावी कोणाला! (चंद्राकडे बघत) पौर्णिमेचा चंद्रमा देखिल आपली वाट बघून बघून कसा म्लान झालाय बघा. अष्टमी पासून बिचारा अगदी दीनवाणा झालाय. मग माझ्या हृदयाची अवस्था ती काय असणार! |
| राजा शूरसेन: | म्हणून तर आम्ही आता ही अडचण कायमची सोडवणार. |
| राजकन्या अवंतिका: | (न समजून) ती कशी? |
| राजा शूरसेन: | आम्ही तुम्हाला कायमच आमच्या सोबत ठेवणार. |
| राजकन्या अवंतिका: | (लाजते. मग लटक्या रागाने म्हणते.) ते खरे, पण मग त्यासाठी तरी आपण वेळेवर यावे. |
| राजा शूरसेन: | प्रिये, अगं मी निघालोच होतो, पण .. |
| राजकन्या अवंतिका: | पण काय, नाथ? |
| राजा शूरसेन: | पण आपले थोरले बंधू, महाराज जयसेन इथे असताना, आम्ही कसे येणार? इतके दिवस महाराज जयसेन कधी इथे आले नव्हते. या वेळी ते इथे असताना, आम्ही विहाराचे संकेत न पाळून कसे चालणार? अशा परिस्थितीमध्ये त्यांना सामोरे कसे जाणार? |
| राजकन्या अवंतिका: | का? त्यात काय एवढे? कधी ना कधी तर आमचे थोरले बंधू, महाराज जयसेन यांना सामोरे जावे तर लागणारच आहे ना! मग हरकत काय? |
| राजा शूरसेन: | (उठून बाजूला जात, खोट्या आविर्भावात) का बुवा? का बरं भेटावे मी महाराज जयसेन यांना? |
| राजकन्या अवंतिका: | (स्वतःशी) आता नाथांनी दादा महाराजांना का भेटावे, हे सुद्धा मीच सांगावे का यांना? या प्रितीचे रुपांतर विवाहामध्ये व्हावे यासाठी दोघेही उत्सुक आहोत, तर विवाहासाठी मागणी नको का घालायला? शुभ कार्याला विलंब नाही का होणार? |
| राजा शूरसेन: | (जणू अवंतिकेच्या मनातले ऐकू आले ..) होय तर! (अवंतिकेच्या जवळ जात) शुभ कार्याला विलंब नकोच मुळी करायला. आम्ही देखिल तुमच्या इतकेच उत्सुक आहोत तुम्हाला अवंती राज्याची राणी बनवण्यासाठी. यासाठी तुमची परवानगी आहे ना? |
| राजकन्या अवंतिका: | हे काय विचारणे झाले? |
| (अवंतिका लाजते आणि आपले मुख दोन्ही हातात लपवते. ते दोन्ही हात हातात घेत शूरसेन गातो.) | |
| राजा शूरसेन: | चंद्रिके, तारिके, प्रिय मज तू मधुलिके। सौंदर्यवती तू मेनके, कोमल जशी तू पर्णिके, भावे मजला हर एक रूप हे, पण त्याहून अधिक मोहक जे, त्यागी, सहनशील, सात्विक ते, मम राज्ञी होण्या अधिक सक्षम, तप:निष्ठ तू शमिके ॥ चंद्रिके, तारिके, प्रिय मज तू मधुलिके। |
Leave a comment